ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता
सकाळच्या आल्हाददायक वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून सिंदी रेल्वे नगर परिषदेच्या स्टेडियमवर पाऊल ठेवले, तर एक विदारक वास्तव डोळ्यांसमोर उभे ठाकते. मॉर्निंग वाॅकसाठी असलेल्या या हक्काच्या मैदानावर दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि सिगारेटचे थूत्कार विखुरलेले दिसतात. आजचे आपले स्थानिक मैदान आणि आपली व्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे, याचे हे उत्तम प्रात्यक्षिक म्हणावे लागेल काय?असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ता सुधाकरराव वाघमारे यांचे कडून विचारल्या जात आहे. या दुर्दैवी वास्तवाच्या बरोबर उलट बाजूला, याच गावातील दुसरी बाजू अंगावर काटा आणणारी आहे. एका बाजूला अंधश्रद्धा आणि भक्तीच्या ओघात भान हरपून गेलेले तरुण पुढील भविष्याची स्वप्ने रंगवत बेफाम नाचत आहेत. याच मातीतील दुसरी तरुण पिढी मात्र पूर्णपणे वेगळ्या संघर्षात आहे. देशाच्या सर्वोच्च पदांवर, आयएएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाऊंटंट किंवा वकील बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हे तरुण डोळे फोडून अहोरात्र अभ्यासात मग्न आहेत. एकीकडे व्यसनाधीनता आणि दिशाहीनतेच्या खाईत जाणारी युवा पिढी आणि दुसरीकडे जिद्दीने यज्ञासारखे अभ्यास करणारे तरुण, असा हा विसंगत विरोधाभास गावाच्या भविष्याविषयी खोल चिंता निर्माण करतो आहे.गावाच्या विकासासाठी आणि युवा वर्गाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ येते, तेव्हा मात्र एक नेहमीचे चित्र समोर येते. गावातील उत्सवांसाठी वर्गणी मागितली की लोक सढळहस्ते पुढे येतात, परंतु जेव्हा विकासाचे अर्ज किंवा तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न घेऊन नेत्यांकडे जाण्याची वेळ येते, तेव्हा राजकारणी आणि पुढारी सोयीस्कर पाठ फिरवतात. “वर्गणीच्या नावावर पैशांसाठी नेत्यांकडे जाण्याऐवजी गावाच्या विकासाचे अर्ज घेऊन का येत नाही?” असा उलट सवाल हेच नेते मंडळी नागरिकांना विचारतात.आज गरज आहे ती केवळ निवडणुकांपुरते राजकारण न करता, गावाच्या भविष्याचा प्रामाणिकपणे विचार करण्याची. सिंदी ग्रामस्थानों जर देवळीसारखे सुसज्ज आणि सुरक्षित स्टेडियम आपल्या गावात उभे राहिले, तर उद्याची पिढी व्यसनांच्या आहारी जाण्याऐवजी मैदानांवर आणि उच्च शिक्षणात आपली मान उंचावल्याशिवाय राहणार नाही. या सुविधा निर्माण झाल्यावरच खऱ्या अर्थाने गावाचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल झाल्याची हमी देता येईल, अन्यथा ही अधोगती अशीच सुरू राहिली तर गावाची वाटचाल कोणत्या अंधाराकडे होईल, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आज आली आहे.


