ए बी के न्यूज लाईव्ह के गणेश /पारशिवनी
कन्हान- सुपर टाऊन परिसरातील हौसालाल पुंड यांच्या घरालगतच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्याने पाच बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. चोरीला गेलेल्या बकऱ्यांची अंदाजे किंमत एक लाख रुपये असून, या घटनेमुळे वृद्ध पुंड दाम्पत्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कन्हान पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.हौसालाल पुंड हे पत्नीसमवेत सुपर टाऊन परिसरात राहतात. बकऱ्या पाळून व चारून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा संसार सुरू होता. त्यांचा मुलगा कळमेश्वर येथे पत्नीसमवेत राहतो. त्यामुळे वृद्ध दाम्पत्याच्या उदरनिर्वाहासाठी बकऱ्यांचे उत्पन्न महत्त्वाचे होते. मात्र, गोठ्यातील पाच बकऱ्या चोरीला गेल्याने त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक आधारालाच धक्का बसला आहे.बकऱ्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पुंड यांनी कन्हान पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या वेळी आर्थिक परिस्थिती सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. बकऱ्या हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने चोरीमुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितलेठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी वृद्ध दाम्पत्याची समजूत काढत त्यांना धीर दिला. चोरीचा तपास गांभीर्याने करून बकऱ्यांचा शोध घेण्यात येईल. तसेच चोरट्यांचा माग काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.दरम्यान, कन्हान पोलिसांच्या डीबी पथकातील अमोल नगरारे व यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीच्या घटनेबाबत उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला असून, बकऱ्या कुठे नेण्यात आल्या आणि चोरीमागे कोणाचा हात आहे, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.या घटनेनंतर सूर्यभान चकोले, संतोष दहीफळकर, संदीप पोकळे, प्रशांत मसार यांनी पीडित पुंड यांच्यासोबत पोलिस ठाण्यात उपस्थित राहून वृद्ध दाम्पत्याला न्याय मिळावा आणि चोरीला गेलेल्या बकऱ्या तातडीने शोधून काढाव्यात, अशी मागणी केली.


