ए बी न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहकेता
नागपूर-वर्धा रोडवरील सेलडोह मार्गावर रस्त्यावरील खड्डे सिमेंट किंवा डांबराऐवजी साध्या मातीने भरण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या देखभालीचे कंत्राट असलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या या ढिसाळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागपूर-वर्धा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना टोल नाक्यावर नियमितपणे पैसे मोजावे लागतात. मात्र, बदल्यात योग्य सुविधा आणि दर्जेदार रस्ते मिळण्याबाबत दुर्लक्ष होत आहे.रस्त्यावरील जीवघेणे खड्डे सिमेंट किंवा दर्जेदार डांबरी मटेरियलने भरण्याऐवजी कंपनीने त्यात अक्षरशः माती टाकून खड्डे बुजवले आहेत.पावसामुळे ही माती पूर्णपणे एका दणक्या पाण्याने वाहून जाणार असून खड्डे पुन्हा जैसे थे होणार आहेत, याचे साधे भानही कंत्राटदार कंपनीला राहिलेले नाही.पावसात माती पसरल्याने रस्ते घसरट होऊन दुचाकीस्वार व वाहनचालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.यावर तात्पुरती मलमपट्टी न करता सेलडोह जवळील या खड्ड्यांमध्ये त्वरित पक्के डांबरी किंवा सिमेंटचे मटेरियल टाकून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी आक्रमकरित्या मागणी नागरिक व वाहनचालक करत आहेत.जेव्हा ”टोलचे पैसे पूर्ण घेतले जातात, तर मग रस्त्यांची डागडुजी निकृष्ट दर्जाची का असा सवाल विचारल्या जात आहे.प्रशासनाने याप्रकरणी तातडीने लक्ष देऊन संबंधित कंपनीवर कारवाई करावीची मागणी होत आहे.या प्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरणाकडून काय पावले उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


