चंद्रपूर प्रतिनिधी/कैलास दुर्योधन
हेडरी–घुग्घुस परिसरातील युवकांना रोजगाराची मागणी…!
दि. ८ सप्टेंबर : कोनसरी, हेडरी व घुग्घुस , चंद्रपूर, तडाली परिसरात विविध औद्योगिक प्रकल्पांना वेग येत असताना स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांच्या जमिनीवर उद्योग उभे राहत असतील, तर त्या उद्योगांमधील रोजगाराचा पहिला हक्क स्थानिक युवकांचा असला पाहिजे, अशी ठाम मागणी शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर यांनी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.औद्योगिक प्रकल्पांमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेत स्थानिक पात्र युवकांना प्राधान्य देण्यात यावे. विशेषतः प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित कुटुंबांतील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.केवळ कायमस्वरूपी नोकऱ्यांपुरता स्थानिक रोजगाराचा विषय मर्यादित न ठेवता कंत्राटी कामे, तांत्रिक सेवा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक, देखभाल व इतर विविध कामांमध्येही स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी मुऱ्हेकर यांनी केली.स्थानिक युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्यविकास प्रशिक्षण केंद्रे व रोजगार मेळावे आयोजित करावेत. उद्योगांमध्ये कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्यानुसार स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यासोबतच उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या (CSR) निधीतून परिसरातील गावांमध्ये पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, रस्ते, मूलभूत सुविधा आणि कौशल्यविकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर उद्योग विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित उद्योग व्यवस्थापनाची संयुक्त बैठक घेऊन स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी ठोस व कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. तसेच हा आराखडा सात दिवसांच्या आत निश्चित करून त्याची अंमलबजावणी सुरू करावी, अशी ठाम मागणी योगेश मुऱ्हेकर यांनी केली आहे.स्थानिकांच्या भूमीत उद्योगांचा विस्तार होत असेल, तर त्या विकासाचा पहिला लाभ स्थानिक युवकांना रोजगाराच्या माध्यमातून आणि स्थानिक गावांना विकासाच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. *स्थानिकांच्या हक्काच्या रोजगाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्थानिकांच्या जमिनी, स्थानिकांचा त्याग आणि स्थानिकांचा रोजगार यांचा योग्य समतोल साधूनच औद्योगिक विकास झाला पाहिजे, अशी भूमिका शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेने मांडली आहे.


