ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता
स्व. गोविंदराव वंजारी व गोविंद मैना फाऊंडेशनच्या वतीने, स्व. लक्ष्मणराव मानकर (गुरूजी) आदिवासी आश्रमशाळा, वडगाव (जंगली), ता. सेलू, जि. वर्धा येथील यशस्वी मुख्याध्यापक मा. श्री. भोंगे सर यांना त्यांच्या ३३ वर्षांच्या निष्ठावान व उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल प्रतिष्ठित ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. शिक्षक आमदार मा. श्री. सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रेरणादायी सोहळ्याला शिक्षक आमदार मा. श्री. अभिजीत वंजारी, माजी शिक्षक आमदार मा. श्री. डायगवाणे सर आणि ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. बबनराव तायवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या हस्ते झालेला हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रामाणिक तपश्चर्येची पावती आहे. स्व. बाळासाहेब कनेर यांनी रोपट्याच्या स्वरूपात लावलेल्या या आश्रमशाळेच्या वटवृक्षाला मा. श्री. भोंगे यांनी गेल्या तीन दशकांत आपल्या कर्तृत्वाचे खतपाणी घालून अधिक बळकट केले आहे. आश्रमशाळा म्हटली की येणाऱ्या अडीअडचणींना त्यांनी कधीही संकट मानले नाही, तर त्या आव्हानांवर मात करत नेहमी सकारात्मक मार्ग काढला. प्रशासकीय शिस्त, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची तळमळ, संस्थेचा सर्वांगीण विकास आणि शिक्षकांना नेहमी न्याय देणारी त्यांची कार्यशैली यामुळे संपूर्ण परिसरात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे विद्यार्थी आणि समाजोत्थानाचे ध्येयकेवळ प्रशासकीय बाजू सांभाळण्यापलीकडे जात सरांनी विद्यार्थ्यांसाठी पालकाची, शिक्षकांसाठी मार्गदर्शकाची आणि संस्थेसाठी एका जबाबदार नेत्याची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देत त्यांना आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे ठरले आहेत.शाळा परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षावया गौरवाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा कु. प्रेषिता कनेर, सचिव विलासराव गिरे, संचालक मंडळ सौ. वर्षा कनेर, सौ. विजया गवळी, सौ. रजनी गिरे तसेच प्राध्यापकवृंद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री. भोंगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.हा सन्मान एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण आश्रमशाळेच्या कर्तृत्वाचा गौरव आहे.” ३३ वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या नेतृत्वाच्या सन्मानाने संपूर्ण शाळा परिवाराची मान अभिमानाने उंचावली आहे


