ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता 
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळखंडोबा मांडणाऱ्या एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराचा फटका तालुक्यातील केळझर ते वर्धा मार्गावरील शेकडों गोरगरीब शाळकरी मुलांना बसत आहे. वर्धा आगाराचे केळझर येथील वाहतूक नियंत्रक गोपाल कुनगटकर हे रोज इमाने एतबारे सकाळी सात वाजता वर्धेहून केळझरला पोहोचतात आणि दररोज विद्यार्थ्यांसाठी बायपासवरून आतमध्ये बस आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सकाळी सातपासून साडेदहा वाजेपर्यंत बायपासवरच थांबावे लागत असून, अनेक बस आगारात किंवा गावात आत येत नसल्याचे उघडकीस आले आहे. ज्या बसेस वेळेवर गावात किंवा आतमध्ये येत नाहीत, त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. चालक आणि वाहकांच्या मनमानी कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही या समस्येकडे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.सकाळी शिक्षणासाठी जाण्याच्या महत्त्वाच्या वेळेत बसेस बायपासवरूनच निघून जातात.नागरिकांनी व पालकांनी केलेल्या तक्रारींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जाते. बसच्या अनियंत्रित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांची शाळा आणि कॉलेजची वेळ चुकत असून त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.अशा या बेजबाबदार कारभारामुळे संतप्त नागरिकांमधून आता संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे – “साहेब सांगा हो, केळझर परिसरातील विद्यार्थ्यांच्या बसची ही समस्या नेमकी कधी सुटणार? की आमच्या मुलांना शिक्षणाला रामराम ठोकत नाईलाजाने शेतात मजुरीच्या कामाची कास धरावी लागणार काय?” प्रशासनाने तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावे.तर परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषीं चालक-वाहकावर कारवाई करावी आणि बसफेऱ्या नियमित कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.


