के गणेश /पारशिवनी
कन्हान
मध्य प्रदेशातील भोपाल येथुन नागपूरच्या दिशेने वर्धा कडे कत्तलीसाठी ३८ गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनर ट्रकवर प्राणीन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कन्हान पोलिसांनी बोर्डा टोलनाक्यावर कारवाई केली. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून कंटेनरसह एकूण ५४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३७ गोवंश जिवंत अवस्थेत आढळले, तर एका गोवंशाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार शनिवार, (दि.५)सप्टेंबर २०२६ रोजी मध्य प्रदेशातून कंटेनर क्रमांक HR-38-V-7353 मधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी नागपूरच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती प्राणीन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच प्राणीण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या वाहनाने संशयित कंटेनरचा पाठलाग सुरू केला आणि याबाबत कन्हान पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी पोलिस पथकासह बोर्डा टोलनाक्यावर पोहोचून नाकाबंदी केली. काही वेळाने मनसर मार्गे नागपूरच्या दिशेने येणारा संशयित कंटेनर दिसताच पोलिसांनी तो थांबवला. पोलिस व प्राणीण फाउंडेशन चे पदाधिकाऱ्यांनी कंटेनरची झडती घेतली असता त्यामध्ये ३८ लहान-मोठे गोवंश अत्यंत दाटीवाटीने भरलेले आढळून आले. जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था नसल्याचे तसेच काही जनावरांचे पाय व तोंड दोराने बांधल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जनावरांच्या वाहतुकीसंदर्भात आरोपींकडे आवश्यक परवाना किंवा कागदपत्रे नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणी मोहम्मद सलीम वल्द मुहम्मद हुसैन (वय ४४), आजाद वल्द युसुफ डेडवालिया (वय ३४), इब्राहीम हुसेन मंसुरी (वय ३८) आणि जाफर मुबारिक तांड्या (वय ३०), सर्व रा. मध्यप्रदेश यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी ३८ गोवंशांची अंदाजे किंमत ३ लाख ८० हजार रुपये, कंटेनरची किंमत ५० लाख रुपये तसेच चार मोबाईलची किंमत ४० हजार रुपये, असा एकूण ५४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.जनावरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ३७ जिवंत गोवंशांना कंटेनरसह गोशाळा, गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी चार आरोपी विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम, भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.प्राणीन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी वेळीच माहिती देऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई शक्य झाली असून ३७ गोवंशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक अनिल मस्के यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक गौंडा, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, पोहवा गुरुप्रकाश मेश्राम, पोशि आकाश सिरसाट, आकाश खोब्रागडे, अश्विन गजभिए, पवन भेंडारकर, गणपत सायरे, वैजनाथ तोटेवार यांच्या सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .


