सेलू / अभय बेदमोहता
सेलू तालुक्यातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदावर कार्यरत असलेल्या मुख्तार उर्फ गोलू शेख यांच्या संचालकपदाच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित संचालक ज्या ग्रामपंचायत मतदारसंघातून बाजार समितीवर प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते, त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील त्यांचे प्रतिनिधित्व आता कायम आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणी सुरगाव येथील रहिवासी राजू नत्थुजी भगत यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी वर्धा येथील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित संचालकाच्या पात्रतेची कायदेशीर तपासणी करून नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, मुख्तार उर्फ गोलू शेख हे ग्रामपंचायत मतदारसंघातून बाजार समितीचे संचालक म्हणून निवडून आले होते. मात्र, संबंधित ग्रामपंचायतमधील त्यांच्या मूळ प्रतिनिधित्वाची मुदत संपल्यानंतरही ते बाजार समितीच्या संचालकपदावर कार्यरत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी संबंधित मतदारसंघातील पात्रता व प्रतिनिधित्वाबाबत कायदेशीर तरतुदी लागू आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीची सध्याची पात्रता कायम आहे का, तसेच संचालकपदावर राहण्यास कायदेशीर अडचण आहे का, याची तपासणी सहकार विभागाने करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.दरम्यान, या तक्रारीमुळे सिंदी बाजार समितीच्या कारभाराबाबत चर्चेला उधाण आले असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालय या तक्रारीची चौकशी करून नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सेलू तालुक्याचे लक्ष लागले आहे.या प्रकरणातील आरोपांबाबत मुख्तार उर्फ गोलू शेख यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
टीप : वरील बातमीतील आरोप हे तक्रारदारांनी केलेले असून, त्यांची सत्यता व संचालकपदाची कायदेशीर पात्रता याबाबत अंतिम निर्णय संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल.


