ए बी के न्यूज लाईव्ह
गणेश खोब्रागडे | पारशिवनी
कन्हान : कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायनगर परिसरात साप्ताहिक बाजारातून घरी परतणाऱ्या ३८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ अज्ञात इसमाने जबरदस्तीने हिसकावून पळ काढल्याची घटना शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) रात्री सुमारे ८.४० वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहप्राप्त माहितीनुसार, सुकेशनी प्रशांत बंसोड (वय ३८), रा. वार्ड क्र. ३, रायनगर, कन्हान, या आपल्या शेजारील महिलेसोबत साप्ताहिक बाजारात गेल्या होत्या. बाजार आटोपून त्या पायी घरी परतत असताना अशोकनगर ते सुरेशनगर मार्गावरील आदर्श शाळेसमोर त्यांच्या मागून एक अनोळखी इसम आलासदर इसमाने निळ्या रंगाची हाफ टी-शर्ट आणि निळ्या रंगाची फुल लोअर पॅन्ट परिधान केली होती. तसेच त्याने चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाचा दुपट्टा बांधला होता. आरोपीने महिलेच्या गळ्यातील जुनी सोन्याची गळसरी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला.महिलेने आरडाओरड केल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला. घटनास्थळी पाहणी केली असता सोन्याचे काही मणी मिळून आले. हिसकावून नेलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत १८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, त्यामध्ये आरोपीच्या हालचाली कैद झाल्याची माहिती आहे. या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या प्रकरणी सुकेशनी बंसोड यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस ठाण्याचे डीबी पथक आरोपीच्या शोधासाठी सक्रिय झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह आरोपीने पसार होण्यासाठी वापरलेल्या संभाव्य मार्गाचाही शोध घेतला जात आहे.या प्रकरणाचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत.


