ऐ बी के न्यूज लाईव्ह
के गणेश /पारशिवनी
विशेष प्रशासकीय पथक, पशू रुग्णवाहिका व जेसीबी उपलब्ध करण्याची मागणी
कन्हान शहर विकास मंच आणि गौसेवा समिती फाउंडेशन, कन्हान क्षेत्राचे प्रशासनाला निवेदन
कन्हान : – कन्हान, कांद्री, टेकाडी परिसरातील महामार्ग, प्रमुख रस्ते, चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा वाढता वावर गंभीर समस्या बनला असून, त्यातून सातत्याने गौमातांच्या अपघातांच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून अपघातांना आळा घालण्यासाठी विशेष प्रशासकीय पथक नियुक्त करावे, पशू रुग्णवाहिका व जेसीबीसह आवश्यक बचाव यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कन्हान शहर विकास मंच आणि गौसेवा समिती फाउंडेशन, कन्हान क्षेत्राच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. शहरातील रस्त्यावर अचानक येणाऱ्या जनावरांमुळे दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला असून, जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांनी अचानक ब्रेक घेतल्याने नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी चक्रधर पेट्रोल पंपासमोर नंदी गंभीर जखमी झाला, २३ व २४ ऑगस्ट रोजी राम मंदिर परिसरात झालेल्या अपघातांत दोन गौमातांचा मृत्यू झाला, २५ ऑगस्टला सात नंबर नाका परिसरात एका गौमातेचा अपघाती मृत्यू झाला, तर २६ ऑगस्टला चक्रधर पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात एक गौमाता गंभीर जखमी झाली. सलग घडलेल्या या घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘प्रशासन आणखी किती गौमातांचे मृतदेह रस्त्यावर पडण्याची वाट पाहणार? एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?’ असा सवाल करण्यात आला. देशी गायींना महाराष्ट्र शासनाने ‘राज्यमाता-गोमाता’ असा सन्मानाचा दर्जा दिल्यानंतर त्यांच्या संरक्षणासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी विशेष प्रशासकीय पथक नियुक्त करून महामार्ग, चौक, बाजारपेठ, पेट्रोल पंप आणि अपघातप्रवण ठिकाणी नियमित पाहणी करावी, मोकाट जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या पशुमालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय दवंडी, ध्वनिक्षेपक, नोटीस व सूचना फलकांच्या माध्यमातून पशुमालकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणीही करण्यात आली. अपघातग्रस्त जनावरांच्या तातडीच्या मदतीसाठी जेसीबी मशीन, पशू रुग्णवाहिका, औषधोपचार साहित्य, दोरखंड, बचाव साहित्य आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. सध्या गंभीर जखमी जनावरांना उपचारासाठी नागपूरहून ॲम्ब्युलन्स बोलवावी लागते, तर मृत जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी गौसेवा समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवक अनेकदा स्वतःच्या खर्चातून जेसीबीची व्यवस्था करतात. प्रशासनाने स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चक्रधर पेट्रोल पंप, धर्मराज शाळा परिसर, राम मंदिर परिसर, सात नंबर नाका आदी अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने पाहणी करून प्रकाशव्यवस्था, सूचना फलक, बॅरिकेडिंग व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली. तसेच निवेदनावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देऊन किती मोकाट जनावरे पकडण्यात आली, किती पशुमालकांवर कारवाई करण्यात आली आणि भविष्यातील अपघात रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली.आता केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी; अपघातानंतर धावून जाणारे प्रशासन नको, तर अपघात होण्यापूर्वी उपाय करणारे प्रशासन हवे,’ असा इशारा देत तातडीने कार्यवाही न झाल्यास गौसेवा समिती, पशुप्रेमी व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. कन्हान शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर आणि गौसेवा समिती फाउंडेशन कन्हान क्षेत्राचे प्रमुख शुभम बावनकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले.यावेळी मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिए, आयुष संतापे, निखिलेश चकोले, मीना गिऱ्हे, अर्चना तांडेकर, जयश्री गडपाडे, नयन गायकवाड, संजय तिवसकर, साजन पात्रे, सागर पात्रे, निराला पात्रे, सूर्य पात्रे, जय पात्रे, अखिल पात्रे, रेहान लौंढे, बॉबी हातागडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदन स्वीकारल्यानंतर कन्हान-पिपरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक घोडके, नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, कांद्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुजित पानतावणे, उपाध्यक्ष बंटी सरोदे तसेच टेकाडी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद इवनाते यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. आता प्रशासनाकडून प्रत्यक्षात किती जलद कार्यवाही होते आणि मोकाट जनावरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होतात का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


