सेलु,अभय बेदामोहता
स्थानिक पोलिस ठाण्याच्या कारभारात कमालीची मनमानी आणि अंतर्गत गटबाजीतून सुरू असलेल्या ‘अर्थकारण’मुळे संपूर्ण खात्यात चर्चेला उधाण आले आहे. नुकतेच डीबी पथकात करण्यात आलेल्या बदलांनंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडल्याचे चित्र निर्माण झाले असून, येथील अनागोंदी कारभाराबाबत आता थेट खात्यातूनच दबक्या आवाजात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डीबी पथकाच्या रचनेत फेरबदल केल्यानंतर पूर्वीपेक्षाही ‘देवाण-घेवाणी’च्या व्यवहारांना आणि हप्त्यांच्या वसुलीला भरघोस उत आला असून हिंगणी येथे अवैध धंदे करणाऱ्यांपासून वसुली करणारा ही फिरत असल्याची चर्चा आहे. हप्त्यांचे दर वाढल्याची उघड चर्चा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिक आणि जाणकारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराला आता थेट पोलिस ठाण्यातीलच काही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचा कडाडून विरोध असल्याचे समोर येत आहे.या वाढत्या आर्थिक उलाढालीमुळे आणि वरिष्ठांच्या मनमानी निर्णयामुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारीच हवालदिल झाले आहेत. बदललेल्या या धाडसी आणि मनमानी परिस्थितीमुळे खात्यात भीतीचे वावटळ घोंघावू लागले असून, उद्या आपल्यावर काय कारवाई होईल किंवा या बेकायदेशीर वसुलीचा बडगा आपल्यावर येईल, या भीतीने कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.वरिष्ठांच्या छत्रछायेत सुरू असलेला हा आर्थिक खेळ असाच सुरू राहिल्यास आगामी काळात या अंतर्गत वादाचा मोठा स्फोट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी करून खात्याची मलीन झालेली प्रतिमा सावरण्याची गरज निर्माण झाली आहे.


