अंकिसा प्रतिनिधी
वेंकट स्वामी चकिनाला
सिरोंचा
सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत लक्ष्मीदेवीपेटा अंतर्गत येणाऱ्या गंजिरामन्नापेठ ते बेडीकेगुडम या मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्गापासून बेडीकेगुडमपर्यंत आजही कच्चा रस्ता असून, स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटूनही या मार्गावर डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीट (CC) रस्ता करण्यात आलेला नाही.सध्या पावसाळा सुरू असल्याने कच्च्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावरील पूल पाण्यामुळे कट झाल्याने गावाचा संपर्क तुटला असून, नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने तसेच पूल खचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गंजिरामन्नापेठ व बेडीकेगुडम परिसरातील नागरिकांनी संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची पाहणी करावी आणि राष्ट्रीय महामार्ग ते बेडीकेगुडम या मार्गाचा डांबरी अथवा CC रस्ता मंजूर करून काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली आहे.


