सेलु/अभय बेदमोहता
स्मशानभूमीच्या रस्त्यावरून मृतदेहासोबत आज ग्रामस्थांना करावी लागली संघर्षमय पायपीट
”जगावे तर मानवी हक्कांसाठी, पण मरावं कुणासाठी?” हा संतप्त सवाल आज सेलु तालुक्यातील सेलडोह नजिकच्या बोरगावच्या दुर्दैवी परिस्थितीने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. स्वातंत्र्याची ७८ वर्षे उलटूनही विकासाचा सूर्य न उगवलेल्या या गावाला अखेरच्या प्रवासातही ‘वनवासाची’च किंमत मोजावी लागली. स्मशानभूमीकडे जाणारा हक्काचा रस्ताच नसल्यामुळे, मृतदेह खांद्यावर घेऊन गेलेल्या प्रियजनांना शेतशिवाराच्या पायवाटेवरच अडवणुकीचा सामना करावा लागला. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे एका ३५ वर्षीय तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांना अक्षरशः संघर्ष करावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील हेलोडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरगाव येथे दि.२६ ऑगष्ट बुधवार रोजी विजय अशोक धूर्वे (वय ३५) यांचे दुर्दैवी निधन झाले. कुटुंबावर आणि गावावर कोसळलेल्या या दुःखाच्या प्रसंगातच गावकऱ्यांसमोर अंत्यविधी पार पाडण्याची मोठी कसोटी उभी ठाकली. गावाने मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यासाठी शेतालगतच्या पायवाटेचा आश्रय घेतला, मात्र शेतमालक वसंता दांडेकर यांनी या मार्गावर मज्जाव केल्याने वाद चव्हाट्यावर आला. शेतकऱ्याच्या या भूमिकेमुळे संतप्त आणि हतबल झालेल्या गावकऱ्यांना नाइलाजाने अंतयात्रा रस्त्यातच थांबवून मृतदेह खाली ठेवावा लागला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी कधीही अशी अडवणूक झाली नव्हती, परंतु मृत्यूनंतरही हक्काचा रस्ता न मिळाल्याने गावकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या.या गंभीर प्रकारची माहिती तत्काळ ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आली. मात्र, हक्काच्या प्रतिनिधींची अनास्था अशी की, ते मदतीसाठी फिरकलेही नाहीत. तासागणिक वेळ निघून जात असतानाही कोणी वाली उरला नाही. अखेरीस, पोलीस पाटील संजय धुर्वे यांनी प्रसंगावधान दाखवत सिंदी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.सिंदी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस पाटलांनी दोन्ही बाजूंच्या गावकऱ्यांची व शेतमालकाची समजूत काढत तात्पुरता मार्ग मोकळा केला आणि अंत्ययात्रा पुढे नेण्यास परवानगी मिळवून दिली. शेतमालकाने रस्ता अडवण्यामागे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे कारण पुढे केले, मात्र या तात्पुरत्या तडजोडीमुळे ‘पुढे काय?’ हा अनुत्तरित प्रश्न कायम राहिला आहे.यापूर्वीही बोरगावच्या नागरिकांनी कायमस्वरूपी रस्त्यासाठी सेलु तहसीलदार कार्यालयात लेखी निवेदने व मागण्या सादर केल्या होत्या. परंतु, प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारात आणि दुर्लक्षामुळे या अत्यंत संवेदनशील प्रश्नाकडे कायम डोळेझाक करण्यात आली. परिणामी, गावकऱ्यांना जिवंतपणीच नव्हे तर मरणोपरांतही नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी आता बोरगावच्या या ज्वलंत व कायमस्वरूपी रस्त्याच्या प्रश्नासाठी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी,वर्धा व सेलु तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा निर्धार केला आहे. ग्रामीण भागातील हा मूलभूत प्रश्न शासन-प्रशासन कधी सोडवणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


