सेलु/अभय बेदमोहता
ईद-उल-फित्र निमित्त सेलु शहर तसेच नजीकच्या प्रतीपंढरी घोराड येथे उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध समाजांच्या सहभागातून या सणादरम्यान सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचे अनोखे दर्शन घडले.
सकाळी घोराड येथे मुस्लिम बांधवांकडून एका भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक श्री संत केजाजी महाराज मंदिराजवळ पोहोचल्यानंतर, बशीरभाई शेख व त्यांच्या परिवाराच्या वतीने मिरवणुकीत सहभागी बांधवांना दूध, चहा व केळीचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
सेलु शहरात विविध घटकांकडून
घोराडहून निघालेली मिरवणूक सेलुमधील विकास चौकात पोहोचली. येथे कलीम शेख यांच्या वतीने पोहे, मटकी उसळ (मोट) व शरबतचे वाटप करण्यात आले. तसेच ‘नवचैतन्य बौद्ध कमिटी’ सेलुच्या वतीने गोड जलेबीचे वितरण करत आनंद व्यक्त करण्यात आला. विविध समाजबांधवांनी मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत करत शहरात सामाजिक सलोख्याचा गोड संदेश दिला.
यानंतर सेलु बाजार रोड येथील जामा मशिदीवरून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. या वेळी सहभागी नागरिकांना शरबत, नाश्ता, केळी व हलवा यांचे वितरण करण्यात आले.
ईदच्या निमित्ताने संपूर्ण शहरभर आनंदाचे वातावरण होते. मेडिकल चौकात साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष व दै.साहसिक चे संपादक रवींद्र कोटंबकार, राजेश वरटकर, पिंटू पांडे आणि पवन रहांगडाले यांनी मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष भेटून ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
सणात कोणतीही अनागोंदी होऊ नये म्हणून सेलू पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक उगले यांच्या नेतृत्वाखाली राकेश
देवगडे, जावेदभाई धामिया, सुनील चावरे आणि गृहरक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत झाली.
या उत्साही वातावरणाचा समारोप करण्यासाठी आज रात्री माहेर मंगल कार्यालयात एका विशेष जंगीइफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, याद्वारे सणाचा आनंद द्विगुणित करण्यात येणार आहे.


