गणेश खोब्रागडे /पारशिवनी
कन्हान : शहरातील शिहोरा, प्रभाग क्रमांक ३ मधील शाळा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेली जागा विकास आराखड्यातून मुक्त/आरक्षणमुक्त करण्यात आली असल्यास त्यास तीव्र विरोध दर्शवत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी, नागपूर तसेच कन्हान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (C.O.) यांना निवेदन देण्यात आले. प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक समशेर पुरवले यांच्या माध्यमातून हे निवेदन सादर करण्यात आले. शाळेसाठी तसेच मुलांच्या खेळाच्या मैदानासाठी राखीव जागेचे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.मुलांच्या शिक्षणासाठी शाळा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे मैदान ही मूलभूत गरज आहे. त्यामुळे अशा सार्वजनिक उपयोगाच्या जागेचे आरक्षण हटवून त्याचा इतर कारणांसाठी वापर करण्यास नागरिकांचा तीव्र विरोध आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आरक्षणात कोणताही बदल झाला असल्यास तो रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी नगरसेविका प्रभाग क्रमांक ३ नीती तेलोते, अंकिता कोठाळे, संगीता सोनवणे, टिकेश्वरी खरे, सरिता खरे, अंजना सोनवणे, भूमेश्वरी चौधरी, मनीषा कडू, पार्वती कायथावास आदी नागरिक व महिला उपस्थित होत्या.“मैदान व शाळेची जागा वाचविण्यासाठी संघर्ष करू!”शाळा आणि खेळाचे मैदान ही भावी पिढीची गरज असून, त्यावर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण किंवा आरक्षण बदल होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका उपस्थितांनी व्यक्त केली. प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यास पुढील काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.या निवेदनामुळे शिहोरा प्रभाग क्रमांक ३ मधील शाळा व खेळाच्या मैदानाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला असून, जिल्हा प्रशासन व नगरपरिषद आता काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


