ए बी के न्यूज लाईव्ह
प्रतिनिधी देवेंद्रकुमार रंगुवार
पोळा सण व गणेशोत्सवाच्या काळात लाकडाची मागणी वाढण्याची तसेच प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता लक्षात घेता, सिरोंचा वनविभाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी सर्व परिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षकांना सतर्क राहून २४ तास विशेष गस्त वाढविण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार वन विभागाने आपली गस्त आणि शोधमोहीम तीव्र केली असून, यादरम्यान असरल्ली वनपरिक्षेत्राच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत इंद्रावती नदीच्या पात्रात लपवून ठेवलेला सागवान लाकडांचा साठा जप्त केला व तस्करांचा मोठा डाव उधळून लावला आहे.सध्या पोळा व गणेश उत्सवानिमित आलेल्या सुट्ट्यांच्या काळात अनेक कर्मचारी सुट्टीवर जातात. परंतु, अशा काळातही आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत असरल्ली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सुट्टीवर न जाता अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जंगल परिसरात अहोरात्र गस्त घातली व आपले काम बजावले. त्यांच्या याच तत्परतेमुळे तस्करांचा एक मोठा कट उधळला गेला आहे. नियतक्षेत्र पेंडलया येथील कक्ष क्रमांक ३४८ मध्ये दोन मोठे सागवान लठ्ठे आढळून आले आहेत. सुरुवातीला हे सागवान लठ्ठे पाण्यामध्ये लपवून ठेवणे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड करून ती लाकडे लपवणे असा तस्करांचा प्लॅन होता. मात्र, वन विभागाच्या वेळेवर झालेल्या या धडक कारवाईमुळे तस्करांचा हा संपूर्ण प्लॅन पार विस्कटून गेला आहे.तस्करांनी पकडले जाण्याच्या भीतीपोटी सागवाणी लाकडांचे मोठे ओंडके वाहत्या पाण्याच्या पात्रात आणि झाडाझुडपांच्या आडोशाला दडपून ठेवले होते. मात्र, गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी अत्यंत सतर्कता दाखवत स्वतः पाण्यात उतरून शोधमोहीम राबवलीवन कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या तीव्र प्रवाहात आणि चिखलात उतरून दडवून ठेवलेले सागवाणी लाकडाचे मोठे ओंडके बाहेर काढले. कंबरभर पाण्यात काम करत कर्मचाऱ्यांनी हे लाकूड खेचून नदीच्या काठावर सुरक्षितपणे आणले.सदर धडक कारवाई सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी तसेच उपविभागीय वनाधिकारी अक्षय मीना यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली. असरली वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी पानगे यांच्या नेतृत्वाखाली पातागुडम उपक्षेत्राच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. उपवनसंरक्षकांच्या आदेशानुसार पोळा सण व गणेशोत्सव काळात वन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वन कर्मचारी अहोरात्र सतर्क राहून गस्त घालत आहेत. या कारवाईनंतर वन विभागाने संबंधित आरोपींचा शोध घेण्याची मोहीम अत्यंत तीव्र केली आहे. आरोपीं विरुद्ध भारतीय वन अधिनियम, 1927 अंतर्गत वनगुन्हा जारी करण्यात येणार आहे जंगलातील मौल्यवान सागवान लाकडांची अवैध तोड किंवा तस्करी करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा वन विभागाकडून देण्यात आला आहे.


