ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू /अभय बेदमोहता
तालुक्यातील रायपूर (जंगली) येथील भगवान धुर्वे यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला ऐतिहासिक आणि संवेदनशील वाद आता टोकाला पोहोचला आहे. मृत्यूनंतर तब्बल सहा दिवस (१२० तास) उलटले तरी न्याय मिळेपर्यंत अंत्यविधी न करण्याच्या भूमिकेवर धुर्वे कुटुंब आणि ग्रामस्थ अजूनही ठाम आहेत. मृतदेह अजूनही सेलु ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात पडून असून, महाराष्ट्राच्या इतिहासातील ही अत्यंत दुर्दैवी आणि पहिलीच घटना मानली जात आहे. या प्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त होत असून, खासदार अमर काळे यांनी न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरल्याने हा संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे.मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीस कायमस्वरूपी सरकारी नोकरी आणि २५ लाख रुपयांची आर्थिक मदत, किंवा नोकरी न मिळाल्यास थेट १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, ही या गोरगरीब कुटुंबीयांची मुख्य मागणी आहे.रायपूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि जिल्हाधिकारी सी.वान्मथी प्रत्यक्ष चर्चेसाठी उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष पसरला. केवळ अधिकार नसलेल्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवून वेळ वाया घालविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाला चर्चेसाठी सुलभ व्हावे क्षम्हणून वर्धा येथील गांधी पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र, वातानुकूलित कार्यालयात येऊन चर्चा करण्याचा प्रशासनाचा आग्रह धुडकावत, जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आंदोलनस्थळी येऊन चर्चा करावी, अशी ठाम भूमिका खासदार अमर काळे व ग्रामस्थांनी घेतली.ग्रामस्थ वर्ध्यावरून माघारी परतल्यानंतर प्रशासनाच्या जिल्हिधिकारी यांनी रायपूर येथे धाव घेत अंत्यविधीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.सरकारी सुट्ट्यांमुळे १३ व १४ सप्टेंबरला विश्रांती घेतल्यानंतर, १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १२:०० वाजता वर्धा येथील गांधी पुतळ्याजवळ पुन्हा एकदा धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार करण्यात आला आहे. खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनीही मोठा पाठिंबा दर्शवला आहे.न्याय मिळेपर्यंत आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेहावर अंत्यविधी होणार नाही,” या भूमिकेवर धुर्वे कुटुंब आणि ग्रामस्थ आजही ठाम आहेत.आता १५ सप्टेंबरच्या आंदोलनापूर्वी प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते आणि हा तिढा कसा सुटतो, याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.


