ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता
सेलू तालुक्यांतर्गत येणाऱ्या रायपूर जंगली परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज बुधवार, दिनांक ९ रोजी सायंकाळचे ४ वाजताच्या सुमारास घडली. भगवान धुर्वे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ते शेतातून काम आटोपून आपल्या घरी परतत असताना गावाजवळच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. या मानवीहल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरामध्ये गेल्या काही काळापासून वन्यप्राण्यांचा, विशेषतः वाघांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जंगलाच्या लगत असणारी शेती आणि मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे शेतकरी व मजुरांना दिवसाढवळ्या किंवा संध्याकाळच्या सुमारास शेतात येणे-जाणे धोकादायक बनले आहे.वन विभागाला याबाबत वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना किंवा प्रतिबंधात्मक पावले उचलली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.या हल्ल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप असून शेतीची कामे कशी करावीत, असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहेशेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तातडीने पावले उचलणे गरजेचे बनले आहे.संबंधित परिसरामध्ये त्वरित कॅमेरे व गस्ती पथक तैनात करून वाघाचा बंदोबस्त करावा ची मागणी होत आहे.मृत शेतकरी भगवान धुर्वे यांच्या परिवाराला शासनाकडून तातडीने भरीव आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी.व शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस विशेष खबरदारीचे उपाय राबवावेत.या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यजीवांच्या वाढत्या हल्ल्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शासन व वन विभाग यावर काय ठोस कारवाई करतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या घटनेची माहिती मिळताच बप्पर झोनचे वन क्षेत्र अधिकारी खेडकर व वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.


