ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
तालुक्यातील केळझर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कार्यरत या महिला कर्मचाऱ्याच्या मुजोरी आणि अरेरावीच्या कारभारामुळे सामान्य नागरिक, शेतकरी व वृद्ध ग्राहक त्रस्त झाले आहेत. तब्बल १५ गावांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार असलेल्या या शाखेत नेहमीच ग्राहकांची गर्दी असते; परंतु येथील काही कर्मचाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे बँकेच्या कामकाजावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पासबुक प्रिंटिंगसारख्या साध्या आणि दैनंदिन कामासाठी ग्राहकांना सकाळी ११ वाजेची कडक वेळ पाळण्याची दमदाटी दिली जाते. “१० ते ११ दरम्यानच या, नाहीतर पासबुक प्रिंट मिळणार नाही,” अशी अरेरावीची भाषा वापरत ग्राहकांना सर्रास हुडकून लावले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. ११ वाजेनंतर बँकेत आले तर काम टाळून थेट दुसऱ्यास फेऱ्या मारण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे दूरवरच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या वृद्ध नागरिकांचे आणि महिलांचे प्रचंड हाल होत आहेत.मनमानी वेळा आणि कायमस्वरूपी रोख टंचाई वशाखेतील संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या येण्या-जाण्याच्या वेळा निश्चित नसल्याची चर्चा आहे. हे कर्मचारी अर्धा-अर्धा तास उशिरा हजर होत असल्याचा आरोप असून, सामान्य ग्राहकांना मात्र विनाकारण ताटकळत ठेवले जाते. “पासबुक प्रिंट करण्यासाठी स्वतः खातेदारच पाहिजे,” अशी जाचक आणि नियमबाह्य अट घालून ग्राहकांना मानसिक त्रास दिला जात आहे. याशिवाय, बँकेत नेहमीच रोख रकमेचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांना आणि गरजवंतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.व्यवस्थापकांची भूमिका सहकार्याची, पण कर्मचाऱ्यांच्या मुजोरीमुळे रोषएकीकडे काही कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असताना, दुसरीकडे शाखेचे व्यवस्थापक अमोल ढबाले आणि क्लर्क संकेत काळे यांची ग्राहकांशी अतिशय सहकार्याची आणि मार्गदर्शक भूमिका असल्याचे नागरिकांनी आवर्जून सांगितले आहे. मात्र, काही महिला कर्मचाऱ्यांच्या ताठर भूमिकेमुळे आणि अरेरावीमुळे संपूर्ण शाखेच्या प्रतिमेला काळीमा फासला जात आहे.ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या कष्टाच्या पैशांवर चालणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेत जर असा ‘कर्मचारीशाहीचा आतंक’ चालत असेल, तर तो सहन केला जाणार नाही, असा सज्जड दम नागरिकांनी भरला आहे. वरिष्ठांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या मुजोरीवर कडक कारवाई करावी आणि ग्राहकांना विनात्रास सन्मानपूर्वक सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी केळझर परिसरातील त्रस्त ग्राहकांकडून केली जात आहे.


