ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता
देशाला स्वातंत्र्य मिळून आठ दशके (८० वर्षे) पूर्ण होत आली असली, तरी आजही ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विकासाच्या वल्गना एका बाजूला सुरू असताना, वर्धा जिल्ह्यातील तब्बल ३३ गावांमध्ये आजवर स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध झालेली नाही. परिणामी, गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना गावाबाहेर मोकळ्या जागेचा किंवा शेतीचा आधार घ्यावा लागत असून, पावसाळा व उन्हाळ्यात या समस्येचे स्वरूप अधिकच भीषण होते.वर्धा जिल्ह्यात एका बाजूला विविध विकास कामांना गती दिली जात असून सरकारी इमारती उभ्या राहत आहेत, मात्र ग्रामपंचायत विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील विविध आठ ही तहसीलमधील ३३ गावांत स्मशानभूमीच नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये सेलु तालुक्यातील जुनगड, गायमुख, बोथली, हिवरा, पहेलानपुर, कामठी, सालई (पेवट) आणि गोहदा या गावांचाही समावेश आहे.स्वातंत्र्याची ८० वर्षे लोटत आल्यानंतरही स्मशानभूमीसारखी अत्यंत संवेदनशील व मूलभूत सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे “येथील लोकांना अमरत्वाचा ईश्वररूपी वरदान मिळालाय का? की येथील लोकांना मरणच नाही कि मृत्यू आल्यानंतर त्यांना कायम उघड्यावरच अग्निसंस्कार देत राहावे लागणार?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. महात्मा गांधीं विनोबा भावेच्या विचारांची पेरणी झालेल्या वर्धा जिल्ह्यात आजही मृत्यूनंतर मूकसंवेदनांचा असा अनादर होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.ऋतू कोणताही, परवड मात्र छळवणुकीची कायमच.स्मशानभूमीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सुविधेविना जीवन जगणाऱ्या या गावांमधील नागरिकांना मृत्यूनंतर अंतिम संस्कार करताना अतोनात त्रास सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा शोधणे ग्रामस्थांसाठी अत्यंत कठीण होऊन बसते. यामुळे मृतकाच्या परिजनांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच परिसरातील नागरिकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.संबंधित प्रशासनाने व यंत्रणेने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तहसीलीतील या आठ गावांमध्ये स्मशानभूमीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी आणि ताबडतोब बांधकाम कार्य सुरू करावे, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.


