सेलु/अभय बेदमोहता
सिंदी रेल्वे पोळ्याची रंगत ओसरली*; मान-सन्मानासाठीची चुरस गेली, शेतकऱ्यांच्या उत्साहावर प्रशासकीय उदासीनत
महाराष्ट्रात बैलपोळ्यासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या आणि सुमारे ८० टक्के कृषिप्रधान असलेल्या तालुक्यातील सिंदी रेल्वे शहरातील बैलपोळ्याची पारंपरिक रंगत आता हळुहळु फिकी पडत चालली आहे. एकेकाळी शहरातील सर्वोत्कृष्ट बैलजोडीचा मान पटकावण्यासाठी बैलजोडी मालकांमध्ये रंगणारी चुरस आता संपुष्टात आली असुन, पालिकेच्या ‘सर्वांना समान बक्षीस’ देण्याच्या धोरणामुळे स्पर्धेची धार बोथट झाल्याची चर्चा शेतकरी व बैलजोडी मालकांमध्ये रंगली आहे.सिंदी रेल्वेत बैलपोळ्यानिमित्त दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असे. शहरातील बैलजोडी मालक वर्षभर आपल्या बैलांची विशेष काळजी घेत पोळ्याच्या मैदानात उतरायचे. सर्वोत्कृष्ट बैलजोडीचा मान मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा रंगत असे. मात्र, आता या स्पर्धात्मक वातावरणालाच फाटा मिळाल्याने पोळ्याच्या पारंपरिक उत्साहावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.पूर्वी नगरपालिकेकडुन बैलजोडींची विविध गटांत विभागणी करून स्पर्धा घेतली जात असे. निवड समिती प्रत्यक्ष मैदानात पाहणी करून प्रत्येक गटातील उत्कृष्ट जोड्यांची निवड करीत होती. समिती सदस्यांनी दिलेल्या गुणांची बेरीज करून गुणवत्तेनुसार क्रमांक जाहीर करण्यात येत असे आणि त्यानुसार बक्षिसे दिली जात होती.या प्रक्रियेमुळे बैलजोडी मालकांमध्ये पहिला क्रमांक मिळविण्यासाठी मोठी चुरस निर्माण होत असे. बैलांचा बांधा, देखभाल, सजावट, आरोग्य आणि एकुण गुणवत्ता यासाठी मालक वर्षभर मेहनत घेत असत. मात्र, निवड प्रक्रियेवर वाद, पक्षपात आणि विशिष्ट बैलजोडींना प्राधान्य दिल्याचे आरोप होऊ लागल्यानंतर परिस्थिती बदलली.पोळ्याच्या मैदानात निवड समितीच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त होऊ लागली. वाद टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने बक्षिसांची संख्या वाढवुन गुणवत्तेनुसार क्रमांक देण्याची पद्धत बंद केली. त्यानंतर प्रत्येक बैलजोडीला समान स्वरूपाची बक्षिसे देण्याची पद्धत सुरू करण्यात आली.मात्र, वाद थांबविताना स्पर्धेचाच जीव घेतला, अशी टीका आता शेतकरी व बैलजोडी मालकांकडुन होत आहे.पोळ्यासाठी अनेक बैलजोडी मालक वर्षभर तयारी करतात. दोन ते तीन लाख रुपये खर्च करून बैलजोडी खरेदी केली जाते. वर्षभर बैलांना विशेष आहार दिला जातो, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. पोळ्याच्या काही महिन्यांपूर्वीपासुन बैलांच्या खाण्यापिण्याच्या खुराकीवर विशेष नियोजन केले जाते. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीखाली बैलांची निगा राखली जाते. एवढी मेहनत आणि खर्च करूनही उत्कृष्टतेला स्वतंत्र मान्यता मिळत नसल्याने बैलजोडी मालकांचा उत्साह कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.पूर्वी मैदानात उतरलेली प्रत्येक बैलजोडी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असे. कोणती बैलजोडी पहिला क्रमांक पटकावणार, कोणाला मान-सन्मान मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असायचे. आज मात्र पहिला क्रमांक, मान-सन्मान आणि प्रतिष्ठेची चुरस उरली नसल्याने त्या मेहनतीमागील प्रेरणाच कमी झाल्याची भावना बैलजोडी मालक व्यक्त करीत आहेत.परंपरा जिवंत ठेवायची असेल तर केवळ बक्षिसांची संख्या वाढवून उपयोग नाही, तर पारदर्शक आणि गुणवत्ताधारित स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची गरज आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.वाद टाळण्यासाठी घेतलेला निर्णय हा पोळ्याच्या उत्साहावर भारीवाद टाळण्यासाठी पालिकेने घेतलेला
समान बक्षिसांचा निर्णय आता पोळ्याच्या पारंपरिक उत्साहावरच भारी पडल्याचे दिसुन येत आहे. बक्षिसांची संख्या नव्हे, तर बैलजोडी मालकांमध्ये उत्कृष्टतेसाठी असलेली चुरस पुन्हा निर्माण झाली, तरच सिंदी रेल्वेच्या बैलपोळ्याची जुनी रंगत परत येईल, अशी भावना शेतकरी व बैलजोडी मालकांकडुन व्यक्त होत आहे.


