ऐ बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
वाढत्या महागाईच्या युगातही तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या रास्त भाव धान्य दुकानाच्या सेल्समनवर उपासमारीची वेळ आली आहे. सिंदी सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती अंतर्गत येणाऱ्या सेल्समनचे वेतन वाढवावे, या प्रमुख मागणीसाठी ‘ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर फेडरेशन’ व सेलू तालुका रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, १५ सप्टेंबरनंतर साखळी उपोषण करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सिंदी सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती मर्यादित (सिंदी रेल्वे) अंतर्गत तालुक्यात एकूण ५ रास्त भाव दुकानांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व ५ दुकानांचे एकूण मासिक कमिशन आणि खाली पोत्यांची विक्री मिळून संस्थेला दरमहा १,६४,३९० रुपयांचे उत्पन्न (१,३९,४०० रु. कमिशन + २४,९९० रु. खाली पोते) मिळते. यातून सर्व पाचही सेल्समनना मिळून केवळ ४६,००० रुपयांचे वेतन दिले जात आहे.ज्यामुळे संस्थेला तब्बल १,१८,३९० रुपयांचा निव्वळ नफा होत आहे.
परंतु, या दुकानांचे दैनंदिन कामकाज सांभाळणाऱ्या सेल्समनना सध्या केवळ ८ ते १० हजार रुपयांपर्यंतच मासिक वेतन दिले जात आहे. आजच्या प्रचंड महागाईच्या काळात या अल्प वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सेल्समनसाठी अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे ज्या सेल्समनचे सध्या १०,००० रुपये वेतन आहे, त्यांचे वाढवून १७,००० रुपये आणि ज्यांचे ८,००० रुपये वेतन आहे, त्यांचे वाढवून १५,००० रुपये करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी संघटनेने दिलेल्या निवेदनात केली आहे.
बातम्यातील मुख्य मुद्दे असे आहे कि,
सोसायटीच्या पाच दुकानांचे एकूण उत्पन्न: १,६४,३९० रुपये (कमिशन व खाली पोते मिळून).
संस्थेचा निव्वळ नफा होतो.१,१८,३९० रुपये.
सेल्समनची मुख्य मागणी अशी आहे की, १०,००० रुपये वेतन असणाऱ्यांचे १७,००० रु. आणि ८,००० रुपये वेतन असणाऱ्यांचे १५,००० रु. करण्यात यावे.
अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास आगामी १५ सप्टेंबरपासून तीव्र साखळी उपोषण सुरू करण्यात येईल.
या निवेदनावर सेलू तालुका अध्यक्ष व मीडिया प्रमुख सतीश भावरकर, उपाध्यक्ष शैलेश वाघ, सचिव सौ. छायाताई वलके, प्रसिद्धी प्रमुख जयमाला नगराळे, कोषाध्यक्ष गौरव तळवेकर तसेच सिंदी राशन दुकानदार सेल्समन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जर प्रशासनाने किंवा संबंधित सहकारी समितीने तातडीने यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर सेलू तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला आहे.


