वर्धा/अभय बेदमोहता
विकासकामांच्या गप्पा मारणाऱ्या यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घालणारा एक भन्नाट प्रकार जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात समोर आला आहे. नांदपूर ते टाकखेड याअवघ्या ६ किलोमीटरच्या रस्त्याचं काम मागील दीड वर्षांपासून कागदावरच रेंगाळलं असून, रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीमुळे चालकांचे हाडे खिळखिळी होत आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या सुस्त कारभाराला कंटाळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अखेर या रखडलेल्या मार्गाची ‘भूतबाधा’ उतरवण्यासाठी थेट संत लहानुजी महाराजांच्या दरबारात साकडे घालत रस्त्यावरच आगळावेगळा प्रतिवाद केला.
गेल्या २० ऑगस्टपासून टाकखेड येथे संत लहानुजी महाराज पुण्यतिथी महोत्सव सुरू असून, याच जीवघेण्या, खड्डेमय रस्त्यावरून हजारो भाविकांनी प्रवास केला. मात्र, लाखो श्रद्धाळू येऊनही प्रशासनाला याचे साधे गांभीर्य आले नाही, हे या भागाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. विश्वाविक्रमी विकासाचे दावे करणाऱ्या नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे हा मार्ग दीड वर्षापासून रखडल्याचा संताप प्रा. डॉ. सुधाकर भुयार यांनी व्यक्त केला.
याबाबत बोलताना प्रा. संजय वानखेडे म्हणाले की, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक रोज जीव मुठीत धरून या मार्गावरून ये-जा करतात. प्रशासनाचा हा अंधगळ कारभार पाहता, लवकरात लवकर या रस्त्याची भूतबाधा न हटवल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड दम कार्यकर्त्यांनी दिला आहे.
या अनोख्या आंदोलनात प्रा. सुधाकर भुयार, प्रा. संजय वानखेडे, पंकज गोडबोले, महेश बिरोले, मनोज राऊत, शेखर पालेकर, मलिक पटेल आणि तोहसीफ भाई सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आता या ‘भूतबाधे’च्या निमित्ताने तरी प्रशासनाला जाग येते आणि या रस्त्याचे काम मार्गी लागते का, याकडे संपूर्ण आर्वी तालुक्याचे लक्ष लागले आहे.


