ए बी के न्यूज लाईव्ह
के गणेश /पारशिवनी
१ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल.
कन्हान : – औषधांच्या नावाखाली अमली पदार्थांची साठवणुक करून विक्री करण्याचा प्रकार कन्हानमध्ये उघडकीस आला आहे. कन्हान पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन नागपुर यांच्या संयुक्त पथकाने (दि.३) नोव्हेंबर ला मध्यरात्री रामनगर, तिवाडे ले-आउट येथील राजेंद्र नामदेवराव हटवार वय ५८ वर्ष यांच्या राहत्या घरी छापा टाकुन Pyeevon Spas Plus या नावाच्या ट्रामाडोलयुक्त एकुण ८,८८० कॅप्सुल जप्त केल्या. या कारवाईत मोबाईलसह एकुण १ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला . प्राप्त माहितीनुसार कन्हान पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकातील पो. हवा. हरीश सोनभद्रे यांना गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली होती की, राजेंद्र हटवार हे आंबेडकर चौकातील राजेंद्र मेडिकल तसेच रामनगर येथील आपल्या राहत्या घरी कोणत्या ही आवश्यक परवान्याशिवाय Pyeevon Spas Plus नावाच्या औषधी कॅप्सुलचा साठा करून त्यांची ग्राहकांना किरकोळ विक्री करित आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवुन एनडीपीएस कायद्यानुसार रात्री छापा टाकण्याची लेखी परवानगी घेतली. त्यानंतर औषध निरीक्षक स्वाती सुधाकर भरडे, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर पेंदोर, पंच आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. मंगळवार (दि.३) नोव्हेंबर ला मध्यरात्री १२.४० ते पहाटे २.४६ वाजेदरम्यान पथकाने राजेंद्र हटवार यांच्या रामनगर येथील राहत्या घरी छापा टाकला. यावेळी घरातील किचन रूममध्ये ठेवलेल्या बंद अवस्थेतील कुलरच्या खालच्या भागात पांढऱ्या रंगाच्या कागदी बॉक्समध्ये औषधी कॅप्सुलचा साठा आढळुन आला. पोलिसांनी व औषध निरीक्षकांनी तपासणी केली असता ३७ बॉक्समध्ये प्रत्येकी २४० याप्रमाणे एकुण ८,८८० कॅप्सुल आढळुन आल्या. या कॅप्सुल मध्ये Dicyclomine HCl, Tramadol HCl आणि Acetaminophen हे घटक असल्याचे पॅकिंगवरील माहितीत नमुद होते. त्यापैकी Tramadol हा एनडी पीएस कायद्यांतर्गत नियंत्रित अंमली पदार्थ असल्याने या साठ्याबाबत पुढील कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ३७ बॉक्समधील कॅप्सुलचे एकुण वजन ४,४४० ग्रॅम असुन त्यांची किंमत ८८ हजार ८०० रुपये असल्याचे पंचनाम्यात नमुद आहे. याशिवाय आरोपीकडुन गडद निळ्या रंगाचा Realme कंपनीचा मोबाईल हँडसेट, ज्याची किंमत २० हजार रुपये आहे, तो देखील जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकुण १ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.या प्रकरणी औषध निरीक्षक स्वाती सुधाकर भरडे यांच्या तक्रारीवरून राजेंद्र नामदेवराव हटवार वय ५८वर्ष, रा. रामनगर तिवाडे ले-ऑऊट कन्हान यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८ (क) व २२ (क) अन्वये कन्हान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत. सदर कारवाई सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी शशांक गौडा आणि पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर पेंदोर, औषध निरीक्षक स्वाती भरडे, प्रशांत रामटेके तसेच पोलीस कर्मचारी हरीश सोनभद्रे, अमित यादव, आकाश सिरसाट, आश्विन गजभिये सह इतर कर्मचाऱ्यांनी केली.


