ए बी के न्यूज लाईव्ह
गणेश /पारकेशिवनी
रात्रीच्या अंधारात अपघातांचा धोका, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष.
कन्हान : – केरडी गावातील रेल्वे उडाण पुलाची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असुन पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन या पुलाची समस्या कायम असुन खड्ड्यांचा आकार वाढत चालल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गाने शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गावातील नागरिक प्रवास करीत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केरडी रेल्वे उडाण पुलावरील खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांची मोठी कसरत होत असुन अवजड वाहनांच्या वर्दळीत अपघाताचा धोका अधिक वाढतो. दिवसा खड्डे दिसत असल्याने वाहनचालक सावधगिरी बाळगतात; मात्र रात्रीच्या अंधारात या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक होते. रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज याच धोकादायक मार्गावरून ये-जा करावी लागत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासुन ग्रामस्थ या समस्येचा सामना करीत असताना संबंधित रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या पुलाच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती झालेली नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. निवडणुकीच्या काळात गावाच्या विकासाची आठवण काढणाऱ्या लोकप्रति निधींनी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गावकऱ्यांना केवळ निवडणुकीपुरती आश्वासने किंवा तात्पुरती खड्डे बुजविण्याची मलमपट्टी नको असुन दर्जेदार आणि टिकाऊ कामाची आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने पुलाची तांत्रिक पाहणी करून त्याची मजबुत व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच दुरुस्ती होईपर्यंत आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समस्त केरडी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. पुलावरील खड्डे हा केवळ रस्त्याच्या दुरवस्थेचा विषय नसुन शेकडो नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन केरडीकरांना या जीवघेण्या प्रवासातुन मुक्त करावे, अशी मागणी जोर धरत आहे.


