ए बी के न्यूज लाईव्ह
के गणेश /पारशिवनी
कन्हान : – मुक्या जनावरांची निर्दयीपणे वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध कन्हान पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करीत गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळुन लावला. बोलेरो पिकअप वाहनातुन दाटीवाटीने आणि क्रूरपणे कोंबुन नेण्यात येणाऱ्या दहा गोवंशांची पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत पाच लाख रुपये किमतीचे वाहन आणि एक लाख दहा हजार रुपये किमतीचे गोवंश असा एकुण सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो. शिपाई राहुल जाधव, आशिष बोरकर आणि सुशीलकुमार तेलंग यांच्या तत्परतेमुळे मुक्या जनावरांना जीवदान मिळाले रविवार (दि.१) नोव्हेंबर रोजी पहाटे ४ ते ४.४० वाजता दरम्यान कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या पोलीस स्टेशनसमोर कामठी रोडवर ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पेंदोर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाची रात्र गस्त व विभागीय गस्त सुरू होती. याच दरम्यान पोलिसांनी नाकाबंदी केली असता एमएच ४० सीएम ८४९१ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप संशयास्पदरीत्या येताना दिसली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये लहान-मोठे दहा गोवंश अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयीपणे कोंबुन वाहतुक केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न करताच चालक रोहित ठवकर वय २८ वर्ष, रा. टवेपार, ता. भंडारा याने वाहनातुन उतरून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला. वाहनातील क्लीनर करण मुलचंद चौधरी वय १७ वर्ष, रा. इंद्रखा, जि. भंडारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध विधिसंघर्षग्रस्त बालक म्हणुन कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पेंदोर यांनी पंच सुरेश संजय रंगारी रा. शिवनगर कन्हान आणि कपिल अशोक शेंडे रा. जवाह रनगर यांना बोलावुन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची व गोवंशांची पाहणी केली. त्यामध्ये काळ्या, पांढऱ्या व लाल रंगांच्या दहा गायी आढळुन आल्या. पोलिसांनी दहा गोवंशांसह बोलेरो पिकअप वाहन जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणी पोलीस शिपाई सुशीलकुमार रामचंद्र तेलंग यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड), (ई), महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ), ५ (ब), ९ तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ८३ व १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालक रोहित ठवकर याचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीधर लक्ष्मण पेंदोर करीत आह पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक गोवंशाची अवैध वाहतुक रोखण्यासाठी कन्हान पोलिसांनी दाखविलेली सतर्कता महत्त्वपुर्ण ठरली आहे. पहाटेच्या अंधारात नाकाबंदी करून वाहन पकडणे आणि दहा मुक्या जनावरांची सुटका करणे, ही पोलिसांच्या तत्परतेची साक्ष आहे. वाहतुक पोलीस अनिल यादव, पोलीस शिपाई राहुल जाधव, आशिष बोरकर आणि सुशीलकुमार तेलंग यांच्या कारवाईतील भूमिकेचे परिसरातुन कौतुक होत आहे.


