ए बी के न्यूज लाईव्ह
के गणेश / पारशिवनी
कन्हान : – नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील टेकाडी गुरुद्वाराजवळ शनिवारी (ता. ३१) पहाटेच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यु झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक घटना स्थळावरून वाहनासह पसार झाला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.प्राप्त माहितीनुसार अमन राजु जोसेफ वय २८ वर्ष रा. रामनगर, कन्हान हा आपल्या मित्रांसोबत शनिवारी पहाटे दुचाकीने नागपुर-जबलपुर मार्गावरून टेकाडीच्या दिशेने जात होता. दुचाकीवर सौरभ पंजाबराव वासे हा वाहन चालवत होता, तर आशिष ऊर्फ गिज्जु कन्हैयालाल ठाकुर मध्ये आणि अमन मागे बसला होता. पहाटे २.४५ वाजता सुमारास टेकाडी गुरुद्वाराजवळ मनसर कडुन येणारा एक अज्ञात ट्रक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे रस्ता ओलांडत उजव्या बाजुला जात असताना दुचाकीची ट्रकच्या मागील उजव्या बाजुला जोरदार धडक बसली. या धडकेत तिघेही रस्त्यावर पडले. सौरभ वासे याच्या गळ्याला तर आशिष ठाकुर याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. अमन याच्या डाव्या डोळ्याखाली मार लागला. अपघातानंतर अमनने प्रसंगावधान राखत रस्त्याने जाणाऱ्या एका कारचालकाला थांबविले आणि त्याच्या मोबाईलवरून १०० क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. तसेच आशिषच्या भावालाही घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेने नागपुर येथील मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले . मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती सौरभ वासे याला मृत घोषित केले. आशिष ठाकुर याच्यावर उपचार सुरू असुन अमनलाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी अमन राजु जोसेफ याच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात ट्रकचालका विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३२, १३४ आणि १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनात पो. हवा. लक्ष्मीकांत माणिकपुरी करीत आहे. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


