ए बी के न्यूज लाईव्ह
सिरोंचा | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील बामणी सबस्टेशनमधील विद्युत पुरवठा करणारी मोठी ३३ केव्ही यंत्रणा बिघडल्यामुळे परिसरातील सुमारे ६० गावांमधील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, शेतीपिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.बामणी सबस्टेशनवरून परिसरातील ६० गावांना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, सबस्टेशनमधील मुख्य विद्युत यंत्रणा खराब झाल्याने वीजपुरवठा विस्कळीत अथवा बंद झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीकामांवर परिणाम होत आहे. परिसरातील हजारो एकर क्षेत्रावरील मिरची, धान, मका तसेच इतर पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.शेतीसाठी वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा असताना विद्युत यंत्रणा बंद पडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे बामणी सबस्टेशनमधील बिघडलेली ३३ केव्ही विद्युत यंत्रणा तातडीने दुरुस्त करावी किंवा आवश्यक असल्यास नवीन यंत्रणा बसवून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व नियमित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसीलदार, सिरोंचा यांना लेखी निवेदन सादर करून दोन दिवसांच्या आत दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनाच्या प्रती आमदार, गडचिरोली जिल्हाधिकारी, वरिष्ठ अभियंता व कनिष्ठ अभियंता, आलापल्ली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा यांना माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.आता संबंधित विद्युत विभाग या मागणीची कितपत दखल घेतो आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किती लवकर वीजपुरवठा सुरळीत करतो, याकडे ६० गावांतील नागरिक व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


