ए बी के न्यूज लाईव्ह
सत्यम गोरा – पेंटीपाका
सिरोंचा तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी सध्या धान पिकावर पडलेल्या किळरोगामुळे चिंतेत सापडले आहेत. आधीच शेतीसाठी लागणारा वाढता खर्च, मजुरी, खते आणि कीटकनाशकांच्या किमती यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यातच धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.शेतकरी मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून धानाचे पीक घेतात. मात्र, पीक तयार होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून रोगाचे नेमके कारण शोधावे. तसेच रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य उपाययोजना, प्रभावी नियंत्रण पद्धती आणि आवश्यक कृषी मार्गदर्शन शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने त्वरित लक्ष देऊन बाधित पिकांचे सर्वेक्षण करावे आणि आवश्यक ती मदत करावी, अशी अपेक्षा धान उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


