ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
सेलू शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर सोमवारी दि.५आक्टोंबर रोजी एक भीषण रस्ता अपघात घडला. रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या तवेरा वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाकर उर्फ दिवाड्या मांढरे (वय ४२, रा. वॉर्ड क्रमांक ४, सेलू) हे आपल्या MH 32 AG 4037 क्रमांकाच्या मोटारसायकलने ग्रामीण रुग्णालय परिसराकडून रस्ता ओलांडत होते. याच वेळी घोराडकडून सेलूच्या दिशेने येणाऱ्या MH 35 M 0747 क्रमांकाच्या तवेरा वाहनाने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात दिवाकर मांढरे हे रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना तत्काळ सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती व काही काळ वाहतूक मंदावली होती. पोलिसांनी गर्दी हटवून वाहतूक पूर्ववत केली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त तवेरा वाहन ताब्यात घेतले असून चालकाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नागरिकांची मागणी अशी आहे की,ग्रामीण रुग्णालयासमोर वाहनांचा वेग अनियंत्रित असतो, त्यामुळे येथे गतिरोधक , सूचना फलक लावावेत आणि पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान, रस्ता ओलांडताना नागरिकांनी दोन्ही बाजूची वाहने पाहूनच पुढे जावे आणि वाहनचालकांनीही वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून ठाणेदार श्री पंकज वाघोडे द्वारे करण्यात आले आहे.


