ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहत
तालुक्यातील केळझर येथील एका घरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीचा छडा लावत सेलू पोलिसांच्या डी. बी. पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेले दागिने, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केळझर (ता. सेलू) येथील रहिवासी सौ. छाया विलास तडस यांच्या घरात १ ऑक्टोबर २०२६ रोजी दिवसा घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेली सोन्याची पोत, सोन्याचे मनी, पदक आणि २,००० रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी छाया तडस यांच्या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास डी. बी. पथकाचे पो.हवा. अनिल केकतपुरे करत असताना गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपी रोशन संजयराव बोरेकर (वय २६ वर्ष) आणि अभिनव किसनाजी देव्हारे (दोन्ही रा. वार्ड क्र. ४, केळझर) यांना अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले व त्यांच कडून १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले.पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींकडून खालील वस्तू जप्त करण्यात आल्या.जुनी हिरो स्प्लेंडर मोटरसायकल MH-32-AW-2820, रेडमी कंपनीचे दोन अँड्रॉईड मोबाईल फोन , रोख २,००० रुपये, ५६ सोन्याचे मनी वजन १.९६० ग्रॅम, आणि सोन्याचे पदक वजन ३.०९० ग्रॅम असेएकूण १,८५,५५० रुपयांचा १००% मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अवघ्या १२ तासांत चोरीचा उलगडा केल्यामुळे तक्रारदारांनी सेलू पोलिसांचे आभार मानले आहेत. सदर धडक कारवाई वर्ध्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार/ सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोउपनि विशाल नल्लावार, अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, गजानन कमठाने, विनायक गोडे, ओमप्रकाश तल्लारी आणि लोकेश पवनकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


