ए बी के न्यूज लाईव्ह सलू/अभय बेदमोहता
बाप-लेकास अटक, तिसरा आरोपी अद्याप मोकाट; पोलिसांच्या भूमिकेवर आणि कारवाईवर पाटील कुटुंबियांचा तीव्र आक्ष
ऑटोतून प्रवासी नेण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन दोन भावांवर सब्वल आणि धारदार कैचीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यातील सुकळी स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेसमोर घडली. शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी ११:३० ते ११:४५ च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात अनिकेत पाटील आणि मनिष पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुकळी स्टेशन येथील दिनेश पाटील (वय ४०) हे शनिवारी सकाळी आपल्या ऑटोने गावातील तेलंगे नामक महिला आणि मसराम दांपत्याला उपचारासाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होते. जिल्हा परिषद शाळेसमोरील गतिरोधकामुळे त्यांनी ऑटोचा वेग कमी केला असता, प्रशांत थुल या ऑटोचालकाने त्यांचा ऑटो अडवून वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर प्रशांत थुल, प्रणय थुल आणि प्रतिक थुल या तिघांनी दिनेश पाटील यांना मारहाण करून ऑटोबाहेर खेचले. ही माहिती मिळताच दिनेश पाटील यांची पत्नी आणि मुले घटनास्थळी पोहोचली. वाद सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच परिस्थिती अधिक चिघळली. याच दरम्यान अनिकेत पाटील आणि मनिष पाटील यांच्यावर सब्वल व धारदार कैचीने हल्ला करण्यात आला. अनिकेत यांच्या पोटावर सब्वलचे दोन घाव घातले गेले, तर मनिष यांच्या पोटावर धारदार कैचीने चार वार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही तातडीने सेलू ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या घटनेत प्रशांत थुल यांच्या हाताला व त्यांच्या पत्नीच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. घटना घडत असताना गावातील कोणीतरी ११२ क्रमांकावर माहिती दिली होती. मात्र, त्याचवेळी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस पाटलांना वादाचे गांभीर्य लक्षात आले नाही, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. वेळेत हस्तक्षेप केला असता तर ही घटना टळली असती, असा दावा पाटील कुटुंबियांनी केला आहे. तसेच पोलीस पाटील आणि आरोपी यांचे संगनमत असल्याचा आणि आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बैठका आयोजित केल्याचा गंभीर आरोपही कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत थुल आणि प्रणय थुल यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ११८(२), ३(५) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तिसरा आरोपी प्रतिक थुल याच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचा आरोप पाटील कुटुंबियांनी केला आहे. पोटावर जीवघेणे वार झाले असतानाही योग्य आणि कडक कलमा न लावता सोपस्काराची कारवाई केल्याचा आक्षेप घेत, सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित कुटुंबाकडून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आणि पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष आता पुढील तपासाकडे लागले आहे.


