ए बी के न्यूज लाईव्ह सेलु, अभय बेदमोहता 
यंदाचा गणेशोत्सव सेलु शहरासाठी सामाजिक भान आणि शिस्तीचा नवा आदर्श ठरला. दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, बेंजो आणि मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांचा दणदणाट पाहायला मिळत असताना यंदा मात्र या प्रकाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला. शहरातील सेलु चार राजा बारभाई गणेश मंडळांने पारंपरिक पद्धतीने गणरायाला निरोप देत ध्वनिप्रदूषण टाळण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे वृद्ध, लहान मुले तसेच ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत ध्वनिप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत जनजागृती केली होती. उत्सव उत्साहात साजरा करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांच्या या आवाहनाला गणेश मंडळांने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीतून दिसून आले.गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजातील डीजे किंवा बेंजोचा वापर न झाल्याने शहरातील वातावरण तुलनेने शांत आणि भक्तिमय राहिले. पारंपरिक वाद्ये, भजन आणि घोषणांच्या माध्यमातून गणरायाला निरोप देण्यात आला. उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज नसते, हे मंडळांने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.दरवर्षी गणेशोत्सवातील मोठ्या आवाजामुळे वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले तसेच विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा चर्चेत असतो. यंदा मात्र ध्वनिप्रदूषणात झालेली घट नागरिकांसाठी दिलासादायक ठरली. त्यामुळे गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक जबाबदारी जपणारा उत्सव ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.उत्सव म्हटला की मोठा आवाज, डीजे आणि ध्वनिक्षेपकांचा दणदणाट आवश्यकच, अशी मानसिकता गेल्या काही वर्षांत रूढ झाली होती. मात्र यंदाच्या गणेशोत्सवाने या मानसिकतेला छेद देण्याचे काम केले. पारंपरिक पद्धतीने, शिस्तीत आणि इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेत उत्सव साजरा करता येतो, हे सेलुतील बारभाई गणेश मंडळांने दाखवून दिले.पोलिस विभागाच्या जनजागृती सोबतच मंडळांने दाखविलेली संयमाची भूमिका यामुळे उत्सवाचे स्वरूप बदलताना दिसले. कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेचा विचार करण्याची पोलिसांची भूमिका यंदा प्रभावी ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता भाकऱ्या गणपती,नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवात दिसून आलेला सकारात्मक बदल मसकऱ्या गणपतीत व नवरात्रोत्सवातही कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उत्सवाच्या आनंदासोबत ध्वनिप्रदूषण टाळणे, निर्धारित वेळेचे पालन करणे आणि नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.उत्सव मोठा असावा; मात्र त्याचा आवाज मोठा असण्याची गरज नाही. दुसऱ्यांच्या शांततेचा, आरोग्याचा आणि हक्कांचा विचार करून साजरा केलेला उत्सवच समाजासाठी अधिक आनंददायी ठरतो हे बारमाही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात करुन दाखवून दिले.गणेशोत्सवापूर्वी करण्यात आलेली जनजागृती, गणेश मंडळांशी साधलेला संवाद आणि नियमांच्या अंमलबजावणीमुळे यंदा सकारात्मक बदल दिसून आल्याचे सेलुचे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस विभागातील सर्व पोलीसांचे व गृहरक्षक दलाच्या या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. आगामी उत्सवांमध्येही अशाच प्रकारे प्रशासन, पोलिस आणि नागरिकांनी समन्वय राखल्यास उत्सवाचा आनंद कायम ठेवत ध्वनिप्रदूषणालाही आळा घालता येईल.


