ए बी के न्यूज लाईव्ह सेलू/अभय बेदमोहता 
सेलू तालुक्यातील केळझरनजीक वडगाव (जंगली) येथे धोंगडी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला तब्बल १७१ वर्षांची परंपरा आहे. गावातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन दरवर्षी श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात हा महोत्सव साजरा करतात. यानिमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.केळझरपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव (जंगली) येथे धोंगडी महाराजांची पुण्यतिथी अनेक वर्षांपासून साजरी केली जात आहे. पोळ्याच्या पाडव्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत गावात मांसाहार न करण्याची परंपरा आजही ग्रामस्थांकडून पाळली जाते. या काळात गावकरी श्रद्धेने हे बंधन पाळतात. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी खांद्यावर घोंगडे, हातात काठी आणि कंदील घेऊन एक संत महात्मा वडगाव (जंगली) येथे आले होते. त्यांनी याच ठिकाणी जिवंत समाधी घेतली. अंगावर घोंगडे असल्यामुळे त्यांना पुढे घोंगडी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गावकऱ्यांनी पुण्यतिथीची परंपरा सुरू केली, जी आजही अखंड सुरू आहे.घोंगडी महाराज हे पवार समाजातील असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यांचे मूळ गाव कोणते, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी त्यांनी वडगाव (जंगली) येथे वास्तव्य केले होते, अशी ग्रामस्थांमध्ये धारणा आहे. गावात एकोपा, शांतता आणि सुख-समृद्धी नांदावी तसेच रोगराई दूर राहावी, या श्रद्धेतून घुगरीचा महाप्रसाद करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.पुण्यतिथीनिमित्त गहू, तांदूळ, ज्वारी आणि बाजरी कडधान्याचे मिक्स करुन यापासून घुगरी तयार केली जाते. त्यासोबत आंबाडीची डाळभाजी तयार करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या महाप्रसादासाठी गावकऱ्यांकडून धान्य आणि आर्थिक स्वरूपात योगदान दिले जाते. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी वडगाव (जंगली) तसेच परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहतात.केळझर, महाबळा, जुनगड, गायमुख, खापरी, शिवणगाव, चौकी, हिंगणी, कान्होलीबारा, आमगाव (खडकी), नवरगाव (पु.) यासह परिसरातील अनेक गावांतील नागरिक या महाप्रसादासाठी आवर्जून उपस्थित राहतात.वडगाव (जंगली) येथील मिलरे कुटुंब मागील ४५ वर्षांपासून मुंबई येथे वास्तव्यास आहे. मात्र, घोंगडी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवासाठी हे कुटुंब दरवर्षी सहकुटुंब गावात उपस्थित राहते. गावाबाहेर नोकरी-व्यवसायासाठी गेलेले नागरिक तसेच विवाहित मुलीही सुट्टी घेऊन या कार्यक्रमासाठी गावात येतात. त्यामुळे या दिवशी संपूर्ण गाव एकत्रित येते.पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी गावात भजन-कीर्तनाचा कार्यक्रम रंगतो. पुण्यतिथीच्या दिवशीही भजनाचा कार्यक्रम आयोजित करून धार्मिक वातावरणात महोत्सव साजरा केला जातो. या दिवशी गावात जणू एक दिवसाची यात्राच भरते. गावातील एक ही नागरिक कामाला न जाता या सोहळ्यात सहभागी होतात. वडगाव (जंगली) येथे धोंगडी महाराजांच्या पुण्यतिथीची चार कार्यक्रम हा १७१ वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आजही ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने जपत आहेत. गहू, तांदूळ, ज्वारी व बाजरी एकत्र करून मिक्स करुन तयार केलेली घुगरी आणि आंबाडीची डाळभाजी हा महाप्रसादाचे प्रमुख आकर्षण असते.या स्वादिष्ट महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. विशेष म्हणजे या सोहळ्यातून गावातील सामाजिक सलोखा, एकजूट आणि सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडते.


