ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु |अभय बेदमोहता
तालुक्यातील रायपूर जंगली येथील दुर्घटनेची शाई सोखत नाही तोच, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत असलेल्या तालुक्यातील हिंगणी गावाजवळ पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. मौजा सोनेगाव परिसरातील शेतात सकाळीच पट्टेदार वाघाने दबा धरून बसत एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर असल्यामुळे शेतकरी शेख हबीब थोडक्यात बचावले आहेत.हिंगणी येथील शेतकरी शेख हबीब हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेले होते. मशागतीची कामे आटोपून साधारण आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते हिंगणी गावाकडे परतण्यासाठी निघण्याच्या बेतात होते. परंतू तेव्हाच काही अंतरावर कपाशीचे पीकात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाकडे अचानक त्यांचे लक्ष गेले. वाघ अंगावर झेप घेण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच शेख हबीब यांनी कमालीचे प्रसंगावधान राखले आणि तातडीने वाहनावर स्वार होत तिथून काढता पाय घेतला.त्यांच्या बचावासाठी त्यांनी केलेल्या आरडाओरडामुळे परिसरातील इतर शेतकरी तातडीने घटनास्थळाकडे धावून आले. शेतकऱ्यांचा गळा आणि वाढलेल्या गर्दीच्या आरडाओरड ऐकुण वाघाने शेतालगत असलेल्या नात्यांकडे पळ काढला. या थरारक घटनेमुळे शेख हबीब सुखरूप बचावले असले, तरी परिसरात तीव्र संताप आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.काही दिवसांपूर्वीच रायपूर जंगली येथे घडलेली हृदयद्रावक घटना ताजी असतानाच, आता बोर व्याघ्र प्रकल्पाच्या प्रादेशिक व लगतच्या क्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांचा विळखा आणि मानवी वस्तीवरील हल्ले वाढले आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. याबाबत वन विभागाला कळविण्यात आले. प्रादेशिक विभागाने तात्काळ या परिसराची पाहणी करून हिंगणी व सोनेगाव शिवारात तातडीने गस्त वाढवावी आणि वाघाचा बंदोबस्त करावा, अशी संतप्त मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, मोठा अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.


