ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता
अन्नदाता शेतकऱ्याचा खरा सखा आणि कष्टाचा सोबती असलेल्या सर्जा राजाचा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेलू शहरात बैलपोळा सण अत्यंत उत्साहात व पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. आज सेलू शहरात शेतकरी बांधवांनी आपल्या लाडक्या बैलजोड्यांना अत्यंत आकर्षक पद्धतीने नटवून आणि सजवून पोळ्यात आणले होते. रंगीबेरंगी झुला, विविध आकर्षक अलंकार आणि सुंदर सजावटीने नटलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी महिला, लहान मुले व नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या निनादात संपूर्ण बाजार परिसर दुमदुमून गेला होता.तर महादेवाच्या गाण्यांच्या निनादामुळे व शेतकरी बांधवांच्या उत्साहपूर्ण वातावरणाने वेगळेच वातावरणाची प्रचिती येत होती. पोळ्यानिमित्त बाजार परिसरात आज विविध खेळणी, साहित्याची दुकाने आणि खाद्यपदार्थांच्या सजलेल्या स्टॉलमुळे या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यावेळी नगरपंचायत सेलूच्या नगर सेवकांच्या उपस्थितीत सर्व शेतकरी बांधव आणि बैलजोड्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलजोड्यांसाठी तीन बक्षिसे, तसेच धष्टपुष्ट बैलजोड्यांसाठी तीन विशेष बक्षिसे देण्यात आली. यासाठी लहान मुलांच्या हस्ते ड्रॉ पद्धतीने १० आकर्षक बक्षिसे काढण्या
त आली.ज्यामुळे शेतकरी व बालकांमध्ये मोठा आनंद दिसून येत होतासायंकाळी पाच वाजताचे सुमारास आंब्याचे तोरण तोडून पारंपरिक पद्धतीने पोळा फुटला असे जाहीर करण्यात आले. तद्नंतर घरोघरी शेतकरी बांधवांनी आपल्या सर्जा-राजाची विधिवत पूजा केली आणि लाडक्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शेतकऱ्याचा खरा साथीदार असलेल्या बैलांप्रतीचा हा सण सेलू शहरात पारंपरिक परंपरा आणि निखळ भक्तीभावाने शांततेत संपन्न झाला.


