ए बी के न्यूज लाईव्ह सेलू/अभय बेदमोहता
वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखणे ही केवळ शासनाची किंवा वन विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, हा संदेश देत सेलू शहरात वन्यजीव सप्ताहानिमित्त भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. वनपरिक्षेत्र हिंगणी व दीपचंद चौधरी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर दणाणून सोडला.वनपरिक्षेत्र अधिकारी मीनल तुरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दीपचंद चौधरी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना मकरंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा उत्साहात प्रारंभ झाला. हातामध्ये वन्यजीव संरक्षणाचे आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी शहरातून फेरी काढली. “वन्यजीव वाचवा, जंगल जगवा” अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.या वेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना वनसंपदा व वन्यप्राण्यांचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून देण्यात आले. मानवाने निसर्गाच्या साखळीत हस्तक्षेप न करता वन्यजीवांशी सहजीवन कसे जगावे, याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.या जनजागृती मोहिमेत सेलूचे क्षेत्र सहाय्यक जयप्रकाश गावंडे, झडशीचे क्षेत्र सहाय्यक सुनील कोतजावरे, वनरक्षक स्वीटी दांडगे (सेलू), ज्ञानेश्वर काहुलकर (सिंदी रेल्वे), प्रणाली वनमाली (चानकी) यांच्यासह हिंगणी वनपरिक्षेत्रातील सर्व वन अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वन्यजीव सप्ताहाच्या या उपक्रमामुळे भावी पिढीमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव आणि संवेदनशीलतेची बी रोवली गेली असून, स्थानिक नागरिकांकडूनही या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.


