Abk news live
सोमनूर :-
वर्षातून एकदाच, मात्र संपूर्ण गावाला एकत्र आणणारा दिवस! श्रद्धा, परंपरा आणि गावाच्या एकजुटीचे अनोखे दर्शन घडविणारी पिढ्यान्पिढ्यांची परंपरा सोमनूर (जुना) गावात आजही मोठ्या भक्तिभावाने जपली जात आहे.दरवर्षी ठरलेल्या दिवशी गावातील एकही व्यक्ती शेतातील काम किंवा इतर कोणतेही काम करत नाही. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला,पुरुष आणि बालकांसह संपूर्ण गावकरी या दिवशी एकत्र येतात. सकाळी लवकरच सर्वजण गावातून निघून सोमनूर रोडवरील संगम परिसरात जातात.दिवसभर गावकरी याच ठिकाणी एकत्र राहतात. यावेळी गावचे कुलदैवत ‘देवरा’ विधिवत आणून त्याची पूजा-अर्चा केली जाते. परिसरात रांगोळी काढून, दिवा प्रज्वलित करून तसेच हळद-कुंकू वाहून देवाची श्रद्धेने पूजा केली जाते.पूजा झाल्यानंतर गावकरी मिळून चुली पेटवून सामूहिक भोजन तयार करतात. त्यानंतर सर्वजण एकाच पंगतीत बसून आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतात. त्यामुळे हा दिवस केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता गावातील एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा उत्सव ठरतो.या दिवशी गावातील सर्व व्यवहार आणि कामे बाजूला ठेवून गावकरी एकत्र वेळ घालवतात. आपसातील गप्पा, हास्य-विनोद, आनंदाचे वातावरण आणि देवावरील श्रद्धा यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पूजा-विधी पूर्ण करून सर्व गावकरी आनंदाने आपल्या घरी परततात.
आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत माणूस माणसापासून दुरावत असताना, सोमनूर (जुना) गावाने पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही एकात्मतेची परंपरा जपली आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.आमच्या आजोबा-पणजोबांच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे. या एका दिवसामुळे संपूर्ण गाव एकत्र येते आणि गावातील एकी टिकून राहते. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही हा दिवस चुकवत नाही,” अशी भावना गावातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.


