ए बी के न्यूज लाईव्ह
प्रतिनिधी सेलु/अभय बेदमोहता
दिवसातून १०-१० वेळा वीज जात असून महावितरणच्या २४ तास वीज पुरवठ्यावरुन १२ तास पुरवठ्याच्या दाव्याची आताच ‘हवा’ निघाली आहे.महावितरणकडून ग्रामीण भागात शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठ्यावरुन ८ तासांवर आणण्याच्या प्रस्तावामुळे शेतकरी घोर चिंतेत आला आहे. असा दावा मोठ्या गाजावाज्याने केला जात असला, तर प्रत्यक्षात हा पुरवठा अत्यंत त्रस्त करणारा ठरत आहे. १२ तासांच्या नावाखाली अखंडीत वीज मिळण्याऐवजी तासा तासाला १० ते १५ वेळा वीज जाण्याचे सत्र आता ही सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सततच्या ट्रिपिंगमुळे आणि लपंडावामुळे शेतकऱ्याचा सिंचनाचा, पाण्याचा आणि मौल्यवान वेळेचा मोठा खोळंबा होत आहे. कागदावर १२ तासांचे गाजर दाखवून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशाच पडत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.विजेचा खेळ एवढ्यावरच थांबत नाही, तर वारंवार वीज गेल्यावर शेतात वीज आल्याचे पाहून पुन्हा पाणी सोडण्यासाठी पळापळ शेतकऱ्यांना करावी लागते. अर्ध्या-पाऊण तासाने पुन्हा वीज गायब होते, ज्यामुळे शेतातील पिकांना सुरळीत पाणी देणे अशक्य झाले आहे. या त्रासाबाबत महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना संपर्क साधल्यास ते फोन उचलत नाहीत आणि चुकून फोन उचललाच, तर “आत्ताच माणूस पाठवतो”, “काम सुरू आहे” अशी गुळमुळीत व उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जाते.शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न आणि वास्तव यात मोठा फरक जाणवतो.१२ तास विजेची घोषणा झाली असली तरी सलग २-३ ताससुद्धा वीज राहणे कठीण झाले आहे.वारंवार येणाऱ्या-जाणाऱ्या विजेच्या कमी-जास्त व्होल्टेजमुळे शेतातील महागड्या इलेक्ट्रिक मोटर आणि पंपाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.तक्रार निवारणासाठी कॉल केल्यास स्थानिक कर्मचारी व अधिकारी उत्तर देण्याचे टाळतात.शेतकऱ्यांना खरोखरच १२ तास प्रामाणिकपणे वीज मिळणार आहे का, की हा फक्त एक राजकीय जुमला आणि शेतकऱ्यांची थट्टा आहे?” असा थेट सवाल आता संतप्त शेतकरी विचारत आहेत. वीज मंडलासह सर्वच ग्रामीण भागातील ही ढिसाळ यंत्रणा तातडीने सुधारली नाही, तर महावितरणच्या या कागदी ‘१२ तास विजेच्या’ दाव्याला काहीही अर्थ उरणार नाही, हेच स्पष्ट होते.


