ए बी के न्यूज लाईव्ह सेलु/अभय बेदमोहता 
निवडणूक जाहीर होताच संपूर्ण मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, सेलू शहर आणि परिसरात आचारसंहितेचे नियम केवळ कागदावरच उरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आठवडा उलटूनही शहरातील प्रमुख चौक आणि वर्दळीच्या रस्त्यांवर सत्ताधारी पक्षासह राजकीय नेत्यांचे बॅनर आणि फलक तसेच झळकत आहेत. यामुळे सेलूच्या नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासन यावर कारवाईचा हातोडा कधी चालवणार, असा रोखठोक सवाल विचारला जात आहे.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच संबंधित क्षेत्रात आचारसंहितेचा अंमल सुरू होतो. २३ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याने प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. मात्र, सेलू शहरात या नियमांना हरताळ फासला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.आचारसंहिता लागू होऊन आठवडा होत आला, तरी शहरातील प्रमुख चौक, सार्वजनिक जागा आणि गर्दीच्या रस्त्यांवरून राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांचे फलक हटविण्यात आलेले नाहीत. विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या बॅनरवर प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. निवडणूक काळात सर्वांना समान न्याय आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, ही मेहेरबानी कशासाठी? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.शहरातील हे फलक नियमाबाह्य आणि आचारसंहितेचा भंग करणारे आहेत का? याची तातडीने चौकशी करून ते हटविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. आता निवडणूक प्रशासन आणि स्थानिक पालिका प्रशासन या बेकायदेशीर बॅनरवर कारवाई करुन निष्पक्षता दाखवणार, की हे राजकीय फलक असेच धडकत राहणार, याकडे संपूर्ण सेलूकरांचे लक्ष लागले आहे.


