ए के न्यूज लाबीईव्ह के गणेश /पारशिवनी
कन्हान
आज गुरुवार (दि. २४) सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर कन्हान शहरासह परिसरात गणेश विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जन शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावे, यासाठी कन्हान पोलीस प्रशासन व कन्हान-पिपरी नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. याच अनुषंगाने बुधवार, दि. २२ सप्टेंबर रोजी काली घाट येथील गणेश विसर्जन स्थळ तसेच विसर्जन मार्गाची पाहणी करून विविध व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला.या पाहणीदरम्यान सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्हान विभाग शशांत गौंडा, कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे तसेच कन्हान-पिपरी नगर परिषद मुख्याधिकारी दीपक घोडके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी काली घाट येथील विसर्जन स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून श्रद्धाळूंची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, विसर्जन मार्ग, विद्युत व प्रकाश व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, रस्त्यांची स्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना यांचा आढावा घेतला. गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक व गणेश मंडळे सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक सुरक्षा व वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.विसर्जनस्थळी पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षा उपाय, वाहतूक नियंत्रण तसेच जीवनरक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस व नगर परिषद प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.दरम्यान, कन्हान-पिपरी नगर परिषदेकडून नागरिकांच्या सुविधेसाठी काली घाट परिसरात घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरण व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.शांततेत व सुरक्षिततेत विसर्जन करण्याचे आवाहनसहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शशांत गौंडा, पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे आणि नगर परिषद मुख्याधिकारी दीपक घोडके यांनी नागरिक तसेच गणेश मंडळांना भक्तिभावाने, उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.विसर्जनाच्या वेळी पोलीस प्रशासन, नगर परिषद व संबंधित विभागांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी आणि सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे भक्ती आणि उत्साहासोबत सुरक्षेला प्राधान्य देत गणरायाला भावपूर्ण निरोप द्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


