ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता
हातात पुस्तकं घेऊन भविष्याची सुंदर स्वप्नं पाहणाऱ्याचा अवघ्या १५ व्या वर्षी नियतीने एका होतकरू विद्यार्थ्याला हिरावून नेले आहे. गेल्या आठ दिवसांपासून नागपूर येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अरमान युसुब शाह या १५ वर्षीय विद्यार्थ्याची प्राणज्योत अखेर मालवली. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अरमानच्या जाण्याने श्री क्षेत्र घोराड परिसरात अत्यंत दुःखाची व शोकाकुल वातावरण पसरले आहे.
कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपुरी पडली
घोराड येथील यशवंत विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अरमानला गळ्याच्या कर्करोगाने ग्रासले होते. सुरुवातीला त्याच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्याला नागपूर येथील जामठा परिसरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’मध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. कुटुंबियांच्या आशा आणि प्रार्थना त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सुरू होत्या; मात्र बुधवारी सायंकाळी नियतीसमोर ही झुंज अपुरी पडली आणि त्याची प्राणज्योत मालवली.
अभ्यासू, शांत आणि अत्यंत मनमिळावू स्वभावाचा अरमान आपल्या मित्र-मैत्रिणी तसेच शिक्षकांमध्ये खूप लाडका होता. शिक्षण पूर्ण करून भविष्यात काहीतरी मोठे करण्याची त्याची उमेद होती; मात्र काळाने त्याला ती संधीच दिली नाही. दहावीचे वर्ष आणि डोळ्यांसमोर पुढील आयुष्याची सुंदर स्वप्ने असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला.
परिस्थितीशी झुंज देणाऱ्या कुटुंबावर दुहेरी आघात
अरमानचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. त्याचे वडील शेळ्या राखून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीतही अरमान अत्यंत जिद्दीने शिक्षण घेत होता. मुलाने शिकून मोठे व्हावे आणि कुटुंबाचा आधार बनावे, हे स्वप्न पाहणाऱ्या आई-वडिलांवर अरमानच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्री क्षेत्र घोराड येथील संत केजाजी महाराज मंदिर परिसरात अरमानचे कुटुंब वास्तव्यास होते. कालपर्यंत शाळेच्या आणि मंदिर परिसरात मित्रांसोबत खेळणारा व हसणारा अरमान आज केवळ आठवण बनल्याने परिसरातील नागरिक, नातेवाईक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले आहेत. अवघ्या १५ वर्षांच्या आयुष्यात त्याचा प्रवास थांबला असला, तरी त्याच्या आठवणी घोराडच्या मातीशी कायमच्या जोडल्या गेल्या आहेत. अरमानवर गुरुवारी मुस्लिम समाजाच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


