ए बी के न्यूज लाईव्ह
प्रतिनिधी देवेंद्रकुमार रंगुवार
अंकिसा सिरोंचा तालुक्यातील आसरेली गाव व परिसरात वाढत असलेल्या डेंग्यूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंकिसा, उपकेंद्र आसरेली आणि उच्च प्राथमिक शाळा आसरेली यांच्या संयुक्त विद्यमाने डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन माडावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली संपूर्ण आसरेली गावातून काढण्यात आली.रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर तसेच इतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर घोषणांच्या माध्यमातून नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधाबाबत माहिती दिली. गावातील विविध वाड्यावस्त्यांमध्ये फिरून नागरिकांना डासांची उत्पत्ती रोखण्याचे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहनडेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराभोवती तसेच परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, घरातील व परिसरातील साचलेले पाणी वाहते करावे, मच्छरदाणीचा वापर करावा, नाल्या व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक लाटकरी यांनी नागरिकांना केले.घराच्या परिसरात कूलर,जुने टायर, प्लास्टिकच्या वस्तू, डबे, नारळाच्या करवंट्या किंवा इतर साहित्यामध्ये पाणी साचू नये, याची विशेष खबरदारी घेण्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.आरोग्य विभाग व शिक्षकांचा सहभागया जनजागृती रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास रंगुवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. लाटकरी, आरोग्य सहाय्यक कृष्णा रंगुवार, अमोल चौहान एलएसओ डॉ. गणेश चौहान सीएचओ, एमपीडब्ल्यू, आशा वर्कर, आरटीडब्ल्यू तसेच इतर आरोग्य कर्मचारी आणि शिक्षकांनी मोलाचे परिश्रम घेतले.डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून आपल्या घरासह संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा आणि डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


