ए बी के न्यूज लाईव्ह सेलु/अभय बेदमोहत
गावकऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सध्या गल्लोगल्ली पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, या विकासकामा दरम्यान ठिकठिकाणी सिमेंट रस्त्यांची चाळणी झाली असून, खोदकामातून निघालेली माती तशीच खड्ड्यात ढकलून नावापुरते लेपन केले जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सेलु येथील प्रभाग क्रमांक एक मधील आदित्य बोरकर ते दत्त सारे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कडेला गट्टू बसवण्याचे काम नगरपंचायत द्वारे सुरू आहे. परंतु, या ठिकाणी प्रथम गट्टू बसवण्याऐवजी खराब व चाळण झालेल्या जुन्या रस्त्याची दुरुस्ती करून सिमेंट काँक्रिटचा मजबूत रस्ता तयार करण्यात यावा, अशी आग्रही मागणी वॉर्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थांनी केली आहे. सदर रस्ता हा पूर्णपणे खराब झाल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना व रात्रीचे वेळेस काही ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर रस्त्याची अवस्था आणखी बिकट होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाईपलाईनच्या नावाखाली रस्त्यांची तोडफोड करून केवळ माती टाकून थातूरमातूर मलमपट्टी केली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.त्यामुळे सुरू असलेले गट्टू बसवण्याचे काम थांबवून नागरिकांच्या गरजा लक्षात घेता या ठिकाणी दर्जेदार सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करावा, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची सद्यस्थिती तपासावी आणि ग्रामस्थांना होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन तातडीने योग्य कारवाई करावी, अशी मागणी भाजप कार्यकारिणीचे सदस्य धीरज पवनारकरसह मोहोल्ल्यातील नागरिकांनी केली आहे.


