ए बी के न्यूज लाईव्ह सेलू/अभय बेदमोहता
शहरात ‘थ्री स्टार’ स्वच्छतेचा मोठा गाजावाजा करणाऱ्या सेलू नगरपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील गटारे आणि शौचालयांतून मशीनद्वारे उपसलेला दुर्गंधीयुक्त गाळ थेट स्मशानभूमी नजिकच्या परिसरात टाकला जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका बाजूला कागदावर स्वच्छतेचे दावे केले जात असताना,दुसऱ्या बाजूला अंत्यसंस्कारासारख्या पवित्र ठिकाणी घाणीचा अड्डा बनल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘थ्री स्टार’ मानांकनाचा डंका पिटणाऱ्या नगरपंचायतीचा कचरा डेपो केवळ कागदावर आणि प्रसिद्धीपुरताच उरल्याची टीका होत आहे.गटारातील घाण व गाळ विहित ठिकाणी न टाकता थेट स्मशानघाटात टाकला जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.या प्रकाराबाबत प्रशासनाचे डोळेझाक सुरू असून, मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी नेमके काय करत आहेत, असा सवाल नागरिक विचारत आहेत.स्मशानभूमी परिसरातील ही घाण त्वरित हटवून निर्जंतुकीकरण करावे आणि यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.फलकावरचे स्टार मोजण्याआधी प्रशासनाने स्मशानघाटातील घाण मोजावी आणि या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी !” ची मागणी जोर धरत आहे.


