ए के न्यूज लाईव्ह सेलू/अभय बेदबीमोहता
सेलू तालुक्यात वन्यजीवांचा आणि हिंसक पशूंचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, शेतकरी वर्गासमोर मोठे उभे संकट येवून ठाकले आहे.नजिकच्या खापरी मुंगापूर येथील शेतात रात्रीच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घालून एकाच गोठ्यातील एका बकऱ्याचा व एका भाकरीचा फडशा पाडल्याची संतापजनक व थरारक घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार,तालुक्यातील मौजा खापरी सेलू रोड लगत शेत सर्वे नं. ४३/२ मधील शेतकरी पुरुषोत्तम वैद्य यांचे शेत आहे. या शेतातील गोठ्यात त्यांच्या मालकीची एक शेळी आणि एक बोकड बांधण्यात आले होते. काल दि. १८ सप्टेंबरच्या रात्री किंवा आज १९ सप्टेंबरच्या पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने या गोठ्यावर अचानक हल्ला केला. या हिंसक हल्ल्यात गोठ्यात बांधलेल्या दोन्ही बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून बिबट्याने त्यांचा फडशा पाडला.आज सकाळी सूर्योदय झाल्यानंतर शेतकरी पुरुषोत्तम वैद्य हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता, गोठ्यातील हा भयानक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी ताबडतोब याची माहिती गावकऱ्यांना व संबंधित वनविभागाला दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनरक्षक छाया पेटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार शेतकरी पुरुषोत्तम वैद्य यांचे यामध्ये सुमारे २० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, ऐन हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर आला असून पदिसतात दररोज कुठे ना कुठे घडत असलेल्या घटनेमुळे खापरी परिसरासह संपूर्ण सेलू तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. खापरी गावात बिबट्याचा वावर आणि हल्ला सतत वाढताना दिसून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. केवळ बिबट्याच नव्हे, तर गावात वानरांचा त्रासही मोठ्या प्रमाणावर वाढला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.दररोज तालुक्यात हिंसक पशूंच्या वाढत्या त्रासामुळे त्रस्त आहेच, परंतु या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. जीव मुठीत धरून जगावे लागत असल्यामुळे शेतमजूर व शेतकरी आता शेतातील कामावर जाण्यास धजावत आहे. शेतीची कामे खोळंबली असून याचा थेट दुष्परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे.या वाढत्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत, गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व वन्यजीवांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलत रात्री ची गश्त वाढवावी, अशी आक्रमक मागणी खापरीचेमाजी सरपंच प्रमोद शंकरराव गव्हाळे यांनी केली आहे.तसेच वनविभागाने या भागात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि पीडित शेतकऱ्याला तातडीने पूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.


