ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता
निसर्गरम्य आणि जैवविविधतेने नटलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांवर सध्या दुहेरी संकट ओढवले आहे. एका बाजूला पावसाने ऐन वेळी पाठ फिरवल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत, तर दुसऱ्या बाजूला वन्यजीवांच्या प्रचंड उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. हिंगणी परिसरातील शेतात दिवसाढवळ्या होणारे वन्यजीवांचे हल्ले आणि शेतीचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.बोर व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघ, अस्वल, रोही आणि जंगली डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.जनावरांवर व मानवावर जीवघेणे हल्ले वाढलेले दिसत असून हिंगणी येथील ‘जुने वाणी मौजे’ भागात सुनील मोहरले यांच्या शेतात बांधलेली बैलजोडी दिवसाढवळ्या वाघाने ठार केली. काही दिवसांपूर्वी धुर्वे नावाच्या शेतकऱ्याचाही वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.दिवसाढवळ्या वाघ फिरत असल्याने शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांच्या रक्षणासाठी शेतात जागली करण्यासाठी जाण्यास असमर्थ ठरले आहेत.संपूर्ण जिल्ह्यात केवळ सेलू तालुक्यातील काही भागांतच रात्रीची वीज जोडणी खंडित करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांनीरात्रीचा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी करीत शेतात सिंगल फेजची वीज रात्रीच्या वेळी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून जनावरांच्या सुरक्षेसाठी व पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी शेतात प्रकाश करता येईल यासाठी वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे व शेखर शेंडे यांनी हिंगणी परिक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा. यावर्षी पावसाने ही दडी मारल्यामुळे आधीच शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात तोंडाशी आलेला घास जंगली जनावरे हिरावून घेत आहेत. अशा परिस्थितीत “कुटुंब जगवायचे कसे?” असा आवासून उभा राहिलेला प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. प्रशासनाने आणि महावितरणने या संवेदनशील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने रात्रीचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी आर्त हाक या भागातील कास्तकारांकडून दिली जात आहे.


