ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
महाराष्ट्राची संस्कृती आणि उत्सवांची परंपरा संपूर्ण जगात अनोखी आहे. यातही सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्थान अढळ आहे. विदर्भातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या सेलू शहरात ‘एक गाव, एक गणपती’ ही गौरवशाली परंपरा जोपासणाऱ्या येथील प्रसिद्ध सेलुचा राजा बारभाई गणेश मंडळ यावर्षी आपल्या स्थापनेचे १२७ वे वर्ष मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करत आहे. या ऐतिहासिक महोत्सवा निमित्त संपूर्ण शहरात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण पसरले आहे.भक्तांच्या सोयीसाठी आणि धार्मिक विधींच्या सुयोग्य नियोजनासाठी मंडळाने यंदाच्या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.स्थापना दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.आरती व लंगर (महाप्रसाद) दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ दररोज रात्री आरतीनंतर महाप्रसाद (लंगर) चे आयोजन करण्यात येईल.तरमहाप्रसाद वितरण कार्यक्रम हा दि.२६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.भव्य महाप्रसाद आटोपल्यानंतर विसर्जन सोहळा हा दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर बाप्पाला निरोप देण्यात येईल.आकर्षक मूर्ती आणि कारागीरबाप्पाची देखणी ही मूर्ती स्थानिक प्रसिद्ध मूर्तिकार पुरुषोत्तम वाल्दे, सेलू यांच्या कुशल हस्ते साकारण्यात आली आहे. त्यांच्या कलेची मोहिनी भाविकांच्या मनावर राज्य करत असून, बाप्पाचे रूप अत्यंत लोभसवाणे आणि दिव्य भासत आहे.यंदाच्या वर्षीची श्रीगणेशाची मूर्ती भंडारी कुटुंबाच्या वतीने सढळ हस्ते भेट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या उत्सवाप्रती भाविकांची अगाध श्रद्धा असल्याचे दिसून येते, कारण सन २०३४ पर्यंत मूर्ती भेट देणाऱ्या यजमानांचे बुकिंग आधीच पूर्ण झाले आहे. मंडळाचे अध्यक्ष सय्यम भंडारी हे मागचे चार वर्षांपासून अबाधित सांभाळत असून यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे. सेलू शहराची ओळख असलेल्या ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेखाली सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे मोठे काम बारभाई गणेश मंडळाने गेल्या १२७ वर्षांपासून अविरतपणे केले आहे. सामाजिक सलोखा, एकात्मता आणि धार्मिक परंपरा जोपासत यंदाचा हा १२७ वा गणेशोत्सव सेलूच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल यात शंका नाही. मंडळाच्या वतीने परिसरातील तमाम गणेशभक्तांनी या धार्मिक महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाद्वारे करण्यात आले आहे.


