ए बी के न्यूज लाईव्ह
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ वरील सिरोंचा ते पातागुडम या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे, सागवानाची झाडे, झुडपे व वेली रस्त्याच्या अगदी कडेला वाढलेल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः तुमनूर ते वडधम परिसरात अनेक वळणाचे मार्ग आहेत. या वळणांच्या ठिकाणी रस्त्याच्या अगदी कडेला वाढलेली झाडे-झुडपे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसू देत नाहीत. परिणामी अचानक समोरून वाहन आल्यास वाहनचालकाला प्रतिक्रिया देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. मोठमोठे ट्रक, मालवाहू वाहने व इतर अवजड वाहने या मार्गाने नियमितपणे ये-जा करतात. अशा वेळी दुचाकीस्वार किंवा लहान वाहनांना बाजू देताना रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे अंगाला लागण्याची तसेच वाहनाचा ताबा सुटण्याची शक्यता निर्माण होते.सोबत जोडलेल्या छायाचित्रांमधूनही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडे-झुडपे आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती स्पष्टपणे दिसून येते.अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीसदर परिस्थिती केवळ रस्त्याच्या सौंदर्याचा किंवा स्वच्छतेचा प्रश्न नसून थेट नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आहे.विशेषतः वळणांवर झाडे-झुडपांमुळे समोरून येणारी वाहने न दिसणे, जड वाहनांना बाजू देताना दुचाकीस्वारांना अडचण येणे आणि रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी होणे यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एखादा अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे.
*म्हणून आपणास विनंती आहे की*
राष्ट्रीय महामार्ग क्र ६३ वरील सिरोंचा-पातागुडम मार्गाची वनविभागामार्फत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी*
विशेषतः तुमनूर–वडधम परिसरातील वळणांची स्वतंत्रपणे पाहणी करून रस्त्याच्या दृष्टीक्षेपात अडथळा निर्माण करणारी झाडे व झुडपे ओळखण्यात यावीत.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली अनावश्यक झाडे-झुडपे, वेली व रस्त्याच्या वाहतुकीस अडथळा ठरणारी वनस्पती यांची नियमानुसार तातडीने छाटणी/साफसफाई करण्यात यावी.
ज्या ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर येऊन वाहनांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करीत आहेत, त्या ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी.
वळणांवर समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दृश्यता मोकळी करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
सदर कामासाठी वनविभाग व राष्ट्रीय महामार्ग संबंधित यंत्रणा यांच्यात समन्वय साधून संयुक्त पाहणी व आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.
भविष्यात पुन्हा रस्त्याच्या कडेला झाडे-झुडपे वाढून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नियमित देखभाल व पाहणीचे नियोजन करण्यात यावे.


