मुख्य संपदक /अशोक कुम्मरी
सिरोंचा :
सिरोंचा–आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्र. 353-C च्या कामाला तब्बल पाच वर्षांचा कालावधी उलटत आला असतानाही महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून, आता बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सिरोंचा तालुका गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शासकीय कामे, आरोग्य सेवा, शिक्षण, व्यवसाय तसेच इतर अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना याच मार्गावरून प्रवास करावा लागतो. मात्र, महामार्गाचे काम अद्याप मोठ्या प्रमाणात अपूर्ण असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.काँक्रीट रस्त्याला बांधकामानंतरच तडे,महामार्गावर काही ठिकाणी सीसी रोडचे काम करण्यात आले आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच काँक्रीटच्या पृष्ठभागाला तडे पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, काँक्रीटची गुणवत्ता आणि कामाची तांत्रिक पद्धत यांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.पाऊस आला की रस्ता चिखलमय,पावसाळ्यात महामार्गाची अवस्था आणखी बिकट होत आहे. अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाल्याने वाहनांची वाहतूक धोकादायक बनते. पाऊस वाढला की बससेवा आणि इतर वाहतूक बंद होण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे रुग्ण, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे,जबाबदार कोण? चौकशीची मागणी,महामार्गाचे काम इतकी वर्षे सुरू असूनही अद्याप पूर्ण का झाले नाही? बांधकाम पूर्ण झाल्यानंतर काँक्रीट रस्त्याला तडे का गेले? कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? निकृष्ट कामाला जबाबदार कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे अनेक सवाल नागरिक उपस्थित करत आहेत,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित प्रशासनाने तातडीने महामार्गाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून निकृष्ट कामाची चौकशी करावी आणि उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.’पाच वर्षे झाली, तरी महामार्ग अपूर्ण; पावसात वाहतूक ठप्प — प्रशासन आणखी किती काळ नागरिकांची परीक्षा पाहणार?”


